1 / 8भारतीय जनता पक्ष एकेकाळी आपल्याच पक्षातील जुन्या आणि निष्ठावान नेत्याच्या खांद्यावरच मुख्यमंत्रिपदाची धुरा देत होता. मात्र आता भाजपच्या राजकारणाची शैली काहीशी बदललेली दिसत आहे. भाजप 'विनिंग फॉर्म्युल्याचा' वापर करताना दिसत आहे. ज्या राज्यांत पक्ष संघटना फारच कमकुवत आहे, तेथे भाजप इतर पक्षांतून आलेल्या मोठ्या नेत्यांवर डाव लावताना दिसत आहे. 2 / 8पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी हे याच रणनीतीचे अगदी ताजे उदाहरण. सुवेंदू अधिकारी यांनी आजच (शनिवार) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याच बरोबर, ते इतर पक्षांतून येऊन थेट भाजपचे मुख्यमंत्री बनणाऱ्या नेत्यांमध्ये सामील झाले आहेत.3 / 8सुवेंदू अधिकारी (पश्चिम बंगाल)- सुवेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी यांचे एक अत्यंत विश्वासू मानले जात होते. ते २०२० मध्ये भाजपमध्ये आले. २००७ च्या नंदीग्राम आंदोलनात त्यांची मोठी भूमिका होती. या आंदोलनाने २०११ मध्ये ममतांना थेट मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवले होते. अधिकारी यांनी २०२१ मध्ये नंदीग्राममधून आणि आता २०२६ मध्ये भवानीपूरमधून ममता बॅनर्जींचा पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध केले. भाजपने बंगालमध्ये त्यांच्या जनाधाराला प्राधान्य दिले आणि त्यांच्या गळ्यात मुख्यमत्रीपदाची माळ टाकली.4 / 8हिमंता बिस्वा सरमा (आसाम) - असामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हे भाजपचे फायरब्रँड नेते आहेत. त्यांनी २०१५ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. २०१६ मध्ये आसाममध्ये भाजपचे पहिल्यांदाच सरकार आले. राज्यात भाजपची सत्ता आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. तेव्हा भाजपने सर्वानंद सोनोवाल यांना मुख्यमत्री बनवले. यानंतर, २०२१ च्या विजयानंतर पक्षाने हिमंता यांना मुख्यमंत्री म्हणून मोठी जबाबदारी दिली.5 / 8पेमा खांडू (अरुणाचल प्रदेश) - अरुणाचल प्रदेशचे काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पेमा खांडू हे २०१६ मध्ये ४३ आमदारांसह पीपीए (PPA) मध्ये गेले. यानंतर केवळ दोनच महिन्यांत त्यांनी पीपीएलाही राम-राम करत ३२ आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे अरुणाचलमध्ये कमकुवत असलेला भाजपला प्रचंड बळ मिळाले आणि खांडू मुख्यमंत्री म्हणून आपल्या पदावर कायम राहिले.6 / 8एन. बीरेन सिंह (मणिपुर) - काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेले एन. बीरेन सिंह २०१६ मध्ये भाजपमध्ये सामील झाले. यानंतर जेव्हा २०१७ साली मणिपूरमध्ये पहिल्यांदा भाजपने सरकार स्थापन केले, तेव्हा त्यांनाच मुख्यमंत्री बनवण्यात आले.7 / 8माणिक साहा (त्रिपुरा) - काँग्रेसची पार्श्वभूमी असलेल्या माणिक साहा यांनी २०१६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. ते २०२० ते २०२२ या काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले. त्रिपुरातील २५ वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर, २०२२ मध्ये भाजपने बिप्लब कुमार देब यांना हटवून माणिक साहा यांच्याकडे राज्याची धुरा दिली.8 / 8सम्राट चौधरी (बिहार) - भाजपने बिहारमध्ये सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्रिपदी बसवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण चौधरी हे आरजेडी आणि जेडीयूची पार्श्वभूमी असलेले नेते आहेत. ते २०१७ मध्ये भाजपत आले आहेत. बिहारमध्ये लालू यादव यांच्या आरजेडीकडे यादव समाजाचे आणि नीतीश कुमार यांच्या जेडीयूकडे कुर्मी समाजाची मतपेटी आहे. यामुळे कुशवाहा/कोइरी समाजातून येणारे सम्राट चौधरी भाजपसाठी अत्यंत महत्वाच आहेत. यामुळे भाजपने हा ऐतिहासिक निर्णय घेतला.