Pune Population: २०११ मध्ये ४५ लाख; आता तब्बल ८० लाखाचा अंदाज, १५ वर्षांत पुणे जिल्ह्याची लोकसंख्या दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:32 IST2026-04-29T14:29:44+5:302026-04-29T14:32:27+5:30

जिल्ह्याची लोकसंख्या २०११ मध्ये अंदाजे ४५ लाख इतकी होती, त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांत या लोकसंख्येत जवळपास दुप्पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे

45 lakh in 201 now estimated at 80 lakh Pune district population doubled in 15 years | Pune Population: २०११ मध्ये ४५ लाख; आता तब्बल ८० लाखाचा अंदाज, १५ वर्षांत पुणे जिल्ह्याची लोकसंख्या दुप्पट

Pune Population: २०११ मध्ये ४५ लाख; आता तब्बल ८० लाखाचा अंदाज, १५ वर्षांत पुणे जिल्ह्याची लोकसंख्या दुप्पट

पुणे: पुढील वर्षी होणाऱ्या जनगणनेपूर्वी स्वगणना व घरगट यादी या उपक्रमातून पुणे व पिंपरी महापालिका वगळता जिल्ह्याची लोकसंख्या ८० लाख इतकी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २०११ मध्ये अंदाजे ४५ लाख इतकी होती. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांत या लोकसंख्येत जवळपास दुप्पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही आकडेवारी अद्याप अधिकृत नसली तरी जनगणनेसाठी तयार केलेल्या परिमंडळाच्या संख्येवरून निश्चित करण्यात आली आहे.

जिल्ह्यात पुढील वर्षी होणाऱ्या जनगणनेची सुरुवात १ ते १५ मे यादरम्यान नागरिकांच्या स्वगणनेद्वारे होत आहे. त्यानंतर १६ मे ते १५ जून या काळात प्रगणक घरोघरी जाऊन घरगट यादी तयार करणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने ६ प्रगणकांच्या गटासाठी एक पर्यवेक्षक नेमला आहे. प्रगणक व पर्यवेक्षकांची एकूण संख्या सुमारे १२ हजार इतकी निश्चित केली आहे. त्यांना घरगट यादी निश्चित करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण आठ मे रोजी पूर्ण होणार आहे.
दरम्यान, नागरिकांना स्वगणना करताना मोबाइलच्या माध्यमातून संकेतस्थळावर स्वतःची माहिती भरता येणार आहे, त्यासाठी ३३ प्रकारची माहिती भरावी लागणार असून, नागरिकांनी भरलेली माहिती प्रगणक तपासून पाहतील आणि त्यानंतर मोबाइल ॲपच्या माध्यमातून संकेतस्थळावर भरतील. त्यामुळे प्रगणकांचे काम हलके होऊन वेळही वाचणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वगणना करताना खरी माहिती भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जिल्ह्यात १६ मे ते १५ जून यादरम्यान घरगट यादी तयार केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रगणकाकडे ८०० नागरिकांचा एक समूह अर्थात परिमंडळ देण्यात आले आहे. प्रगणक प्रत्येक घरात जाऊन त्या संदर्भातील माहिती गोळा करून घरगट तयार करणार आहे. प्रत्येक गावातील लोकसंख्येनुसार जिल्ह्यात एकूण १० हजार १७२ परिमंडळ तयार केले आहेत. हे परिमंडळ तयार करताना आशा सेविका, तसेच तलाठ्यांकडून आलेल्या माहितीचा आधार घेण्यात आला आहे. काही गावांमध्ये अनेक परिमंडळ तयार झाले असून छोट्या वाड्या आणि वस्त्यांवर मात्र, ८०० पेक्षा कमी लोकसंख्या असली तरीदेखील एक परिमंडळ तयार करण्यात आले आहे. मात्र, ही संख्या तुलनेने कमी आहे.

जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार खेड तालुक्यात सर्वाधिक १६७० परिमंडळ तयार झाले आहेत. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात शहरी, तर काही प्रमाणात डोंगरी भाग असल्याने परिमंडळांची संख्या अधिक असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. खेडपाठोपाठ हवेली तालुक्यात ११५०, शिरूर १०७९, मावळ १०३४, मुळशी ८१५, बारामती ८१०, जुन्नर ६७७, इंदापूर ६१३, दौंड ७४६, आंबेगाव ४४९, पुरंदर ४२२, भोर ४१०, राजगड १४७ परिमंडळ तयार करण्यात आली आहेत. तर पुणे खडकी व देहू कॅन्टोन्मेंटमध्ये १८६ परिमंडळ तयार करण्यात आली आहेत, यामध्ये सर्व नगरपरिषद यांचा देखील समावेश केला आहे.

एका परिमंडळात एकूण ८०० नागरिकांचा समूह असल्याने एकूण परिमंडळांची संख्या लक्षात घेता जिल्ह्याची लोकसंख्या ८० लाखांच्या घरात असल्याचे स्पष्ट होत आहे. तर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेतील परिमंडळांची संख्या लक्षात घेतल्यास जिल्ह्याची एकूण लोकसंख्या निश्चित होणार आहे. यापूर्वी २०११ मध्ये जनगणना झाली होती. त्यानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची लोकसंख्या ४५ लाख ७७ हजार इतकी होती. तर पुणे शहराची लोकसंख्या ३१ लाख २४ हजार व पिंपरी शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार होती. त्यामुळे नव्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची लोकसंख्या केवळ १५ वर्षांत जवळपास दुप्पट झाली आहे.

Web Title : पुणे की आबादी 15 वर्षों में दोगुनी, 80 लाख अनुमानित

Web Summary : पुणे जिले की आबादी 80 लाख अनुमानित है, जो 2011 के 45 लाख से पंद्रह वर्षों में दोगुनी हो गई। आगामी जनगणना में स्व-गणना और गृह सूची का उपयोग किया जाएगा। नागरिक ऑनलाइन डेटा जमा कर सकते हैं, जिससे प्रगणकों को सहायता मिलेगी। खेड में सबसे अधिक प्रगणन ब्लॉक हैं।

Web Title : Pune's Population Doubles in 15 Years, Estimated at 80 Lakh

Web Summary : Pune district's population is estimated at 80 lakh, doubling in fifteen years since 2011's 45 lakh. The upcoming census utilizes self-enumeration and household listings. Citizens can submit data online, aiding enumerators. Khed has the most enumeration blocks.