Crime News : पिंपरीत राष्ट्रवादी नगरसेविकेच्या पतीला मारहाण अन् जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 15:17 IST2026-04-21T15:15:32+5:302026-04-21T15:17:00+5:30
- बाजारात अतिक्रमण कारवाईदरम्यान घडली घटना; पोलिसांची प्रारंभी अनास्था

Crime News : पिंपरीत राष्ट्रवादी नगरसेविकेच्या पतीला मारहाण अन् जीवे मारण्याची धमकी
पिंपरी : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नगरसेविका सविता आसवानी यांचे पती धनराज आसवानी यांना एका दुकानाचे मालक व त्याच्या साथीदारांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना अतिक्रमणविरोधी पथकाच्या कारवाईदरम्यान रविवारी (दि. १९) रात्री साडेसातच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. याबाबत रात्री उशिरा पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पिंपरी पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, फय्याज शेख ऊर्फ रिंकू, आरीफ शेख, मुल्लाजी, अरबाज, शोहेब, उमर, इरफान व इतर ४-५ संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता अतिक्रमणविरोधी पथक शगुन चौक, पिंपरी मार्केट परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करत होते.
धनराज आसवानी हे घटनास्थळी पोहोचले आणि मोबाइलमध्ये चित्रीकरण करत असताना उत्तमसिंग वलेचा चौकातील एक दुकान मालक फय्याज शेख याने रागावून हल्ला केला. फय्याज, आरीफ शेख, मुल्लाजी, अरबाज, शोहेब, उमर, इरफान व इतर ४-५ संशयितांनी हाताने-लाथांनी मारहाण केली. नंतर शगुन चौकात पाठलाग करून पुन्हा शिवीगाळ व धमकी दिली, असे आसवानी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
व्यापाऱ्यांनी केला रास्ता रोको
सविता आसवानी यांच्या प्रभाग क्र. १९ मध्ये पिंपरी कॅम्पसह परिसर येतो. त्यामुळे घटनेची माहिती समजताच व्यापाऱ्यांनी पिंपरी कॅम्प पोलिस ठाण्यात धाव घेतली. परंतु, प्रारंभी तक्रार घेतली नाही. यामुळे रात्री साडेनऊ ते साडेदहापर्यंत व्यापाऱ्यांनी शगुन चौकात रास्ता रोको केला. मध्यरात्री २ वाजता अखेर तक्रार दाखल झाली.
गैरसमजुतीतून तक्रार दाखल करून घेण्यात आली नव्हती. मात्र, रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. - विद्यानंद पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पिंपरी पोलिस ठाणे