Akshaya Tritiya: अक्षय तृतीयेस सोन्याला झळाळी; सराफा बाजारात खरेदीचा उत्साह शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 18:11 IST2026-04-19T18:10:54+5:302026-04-19T18:11:21+5:30
Akshaya Tritiya : महागाई आणि दरवाढीचा परिणाम नाही; हलक्या वजनाच्या दागिन्यांना वाढती पसंती, मजुरीत सवलतींची रेलचेल

Akshaya Tritiya: अक्षय तृतीयेस सोन्याला झळाळी; सराफा बाजारात खरेदीचा उत्साह शिगेला
पिंपरी : शहरातील सराफा बाजारास अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर झळाळी मिळत असून, महागाई व सोन्याच्या वाढत्या दरांनंतरही ग्राहकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या या दिवशी सोने खरेदी केल्यास समृद्धी आणि वैभव वाढते, अशी धारणा असल्याने बाजारात खरेदी आणि बुकींगचा जोर वाढला आहे. अक्षय तृतीया रविवारी असून, दसऱ्यापेक्षाही आता सोने खरेदीला अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.
सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे १ लाख ५२ हजार ५०० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४२ हजार रुपयांवर पोहोचला आहे. यावर तीन टक्के जीएसटी आणि ७ ते १२ टक्क्यांपर्यंत मजुरी आकारली जात असली तरी ग्राहकांच्या खरेदीवर त्याचा फारसा परिणाम दिसत नाही.
हलक्या वजनाच्या दागिन्यांची ‘क्रेझ’
बाजारात सध्या हलक्या वजनाच्या दागिन्यांची विशेष ‘क्रेझ’ दिसत आहे. वाढत्या दरामुळे सराफा व्यावसायिकांनीही ग्राहकांच्या खिशाला परवडणारे पर्याय उपलब्ध करून देत नव्या ‘ट्रेंड’ला चालना दिली आहे. दरम्यान, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ज्वेलर्सनी ४० ते ५० टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली आहे.
अक्षय तृतीयेनिमित्त सोन्याच्या दागिन्यांची बुकींग जोरात आहे. दरवर्षी या सणाला सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. दसरा सणापेक्षाही अक्षय तृतीयेला सोने खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळतो. -सुनील सोनिगरा, संचालक, के. डी. सोनिगरा ज्वेलर्स, देहूरोड
सध्या लग्नसराईसाठी आणि अक्षय तृतीयेचे वेगवेगळे बुकिंग सुरू आहे. महागाई असली किंवा सोन्याचे दर वाढले तरी सोन्यावरील ग्राहकांची विश्वास कायम असल्याने बुकिंगवर कोणताही परिणाम दिसून येत नाही. मजुरीवर सवलत दिली आहे. -रवी कावेडिया, संचालक कावेडिया ज्वेलर्स प्रा. लि., जुनी सांगवी.
आमच्या भोसरी येथील नूतनीकरण केलेल्या शाखेचे शुक्रवारी उद्घाटन झाले. यानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. भोसरी शाखेला ४३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोन्याच्या मजुरी दरावर ४३ टक्के इतकी घसघशीत सवलत दिली आहे. -मयूर सोलंकी, सोलंकी ज्वेलर्स, भोसरी.
सोन्याचे दर सध्या स्थिर आहेत. मजुरीवर थेट ५० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तासाठी सोन्याची आगाऊ ४० टक्के बुकिंग झाली आहे. हलक्या वजनाच्या दागिन्यांना ग्राहकांकडून विशेष पसंती मिळत आहे. - विलास भांबुर्डेकर, भांबुर्डेकर सराफ अँड ज्वेलर्स, भोसरी