Hardik Pandya Gives Blunt Take on Tilak Varma And Jasprit Bumrah : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदाच्या हंगामातील सलग चार पराभवानंतर अखेर दुसऱ्या विजयाची नोंद केली. २०० धावांचा बचाव करताना मुंबई इंडियन्सच्या संघाने गुजरात टायटन्सला १०० धावांत ऑलआउट करत आयपीएल स्पर्धेतील या मैदानातील पराभवाची मालिकाही खंडीत केली. या सामन्यात तिलक वर्मा विक्रमी नाबाद शतकासह मुंबई इंडियन्सचा हिरो ठरला. बुमराहनंही या सामन्यात विकेटचे खाते उघडले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिलक वर्मा आणि बुमराहसंदर्भातील कळीचा मुद्दा
आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यावर मैदानात उतरलेला तिलक वर्मा सुरुवातीला धावांसाठी संघर्ष करताना दिसला. कर्णधार हार्दिक पांड्यानं ब्रेकमध्ये त्याची शाळा घेतली. हा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यात जसप्रीत बुमराहच्या पहिल्या षटकाची भर पडली. पहिले षटक टाकण्याची संधी मिळताच बुमराहनं यंदाच्या हंगामातील पहिल्या विकेटचा डाव साधला. या दोन्ही गोष्टीवरून हार्दिक पांड्या ट्रोल झाला. पण सामन्यानंतर हार्दिक पांड्याने तिलक वर्मासोबत काय बोलणं झालं? यासोबतच बुमराहला पहिले षटक देण्याच्या कळीच्या मुद्यावरून स्पष्ट भाष्य करत ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
हा विजय अधिक समाधान देणारा
सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, हा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. घराबाहेर जाऊन जिंकणं नेहमीच आव्हानात्मक असतं. त्यातही अहमदाबादचं मैदान मुंबई इंडियन्ससाठी फारसं अनुकूल राहिलेलं नाही, त्यामुळे हा विजय अधिक समाधान देणारा आहे.
तिलक वर्मासंदर्भात काय म्हणाला हार्दिक पांड्या
शतकी खेळीसह मुंबई इंडियन्ससाठी हिरो ठरलेल्या तिलक वर्माचेही हार्दिक पांड्याने कौतुक केले. तो प्रतिभावंत खेळाडू आहे. त्याला सल्ला देण्याची गरज नाही. तो मोठी खेळी करण्यात माहिर आहे. ही फक्त वेळेची बाब होती. त्याची ही खेळी संघासह त्याच्यासाठी खूप गरजेची होती, असे म्हणत ब्रेकमध्ये मी त्याला फक्त तो काय करू शकतो याची जाणीव करून दिली, असे हार्दिक पांड्याने सांगितले.
तो माझा प्रॉब्लेम नाही, बुमराहसंदर्भातही तो स्पष्टच बोलला
जसप्रीत बुमराह नव्या चेंडूवर गोलंदाजी का करत नाही? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आयपीएलमध्ये बुमराहनं ७-८ वेळाच नव्या चेंडूसह सुरुवात केली असेल. त्यामुळे हा माझा प्रॉब्लेम नाही, असे म्हणत मी त्याला पहिले षटक टाकू देत नाही, हा लोकांचा गोड गैरसमज असल्याचे स्पष्ट मत मांडत हार्दिक पांड्याने या मुद्यावरून ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.