IPL 2026 GT vs MI Mumbai Indians won by 99 runs vs Gujarat Titans : तिलक वर्माच्या विक्रमी जलद शतकी खेळीनंतर अश्वनी कुमार याने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने पराभवाची मालिका खंडीत करत अखेर यंदाच्या हंगामातील दुसरा विजय नोंदवला. दुसऱ्या बाजूला अहमदाबादच्या घरच्या मैदानात २०० धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सवर ९९ धावांनी पराभवाची नामुष्की ओढावली. मुंबई इंडियन्सच्या संघाने पाच सामन्यानंतर पहिल्यांदाच गुजरात टायटन्सला घरच्या मैदानात पराभूत करत खास विक्रम रचला. मुंबई इंडियन्सचा IPL च्या इतिहासातील हा चौथा सर्वात मोठा विजय ठरला तर गुजरात टायटन्सच्या नावे IPL च्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्येची नोंद झाली.
अहमदाबादच्या मैदानात नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या संघाने पॉवर प्लेमध्ये ४४ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या. संघ अडचणीत असताना तिलक वर्मा आणि नमन धीर जोडी जमली. या दोघांनी अर्धशतकी खेळीसह संघाचा डाव सावरला. नमन धीर ३२ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार मारून ४५ धावांवर बाद झाल्यावर तिलक वर्मानं अविश्वसनीय आणि विक्रमी शतक झळकावले. त्याने ४५ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने केलेल्या नाबाद १०१ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ बाद १९९ धावा करत गुजरात टायटन्ससमोर २०० धावांचे टार्गेट सेट केले होते. गोलंदाजीत गुजरातकडून रबाडाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.
धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पहिले षटक घेऊन आलेल्या जसप्रीत बुमराहनं पहिल्याच चेंडूवर साई सुदर्शनला चालते केले. वॉशिंग्टन सुंदरनं १७ चेंडूत केलेल्या २६ धावा वगळता गुजरातच्या कोणत्याच बॅटरचा मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. परिणामी गुजरातचा डाव १५.५ षटकांत १०० धावांवरच आटोपला. मुंबई इंडियन्सकडून अश्वनी कुमार याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. अल्लाह गझनफर आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी २-२ तर बुमराह आणि पांड्याने १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.