रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 23:52 IST2026-04-20T23:52:23+5:302026-04-20T23:52:52+5:30

एका क्लबचा कोच असल्याची बतावणी : आरोपी वाराणसीला फरार : क्रिकेटचे स्वप्न दाखवत फसवणूक

Two youths duped of Rs 20 lakhs in the name of giving them a chance in Ranji cricket | रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा

AI Generated Image

योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रणजी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवत आंध्रप्रदेशातील एका तरुणासह त्याच्या मित्राची तब्बल २० लाख २ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने तो स्वत: क्रिकेटचा कोच असल्याचा दावा केला. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

कोल्लू वीरा वेंकट फणिंद्र कुमार (२७, विजयवाडा, आंध्र प्रदेश) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आरोपी काजी जीशान अहमद (अनंतनगर, काटोल रोड, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. कोल्लू हा क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी प्रयत्नशील असून, तो इन्स्टाग्रामवर क्रिकेटसंबंधित व्हिडिओ पाहत होता. त्यावेळी त्याला आरोपी काजी जीशान अहमद याो प्रोफाइल दिसला. त्याने स्वतःला डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी, मिहान येथे कोच असल्याचा त्यात दावा केला. 

कोल्लूने त्याच्याशी संपर्क साधला. त्याच्या सांगण्यावरून तो जून २०२३ मध्ये त्याला भेटायला नागपुरात पोहोचला. मी तुला बाहेरच्या राज्यातून रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळवून देऊ शकतो, माझे मोठे संपर्क आहेत अशी बतावणी काजीने केली. ऑक्टोबर २०२४ मध्ये आरोपी थेट फिर्यादीच्या विजयवाडा येथील घरी गेला आणि कुटुंबीयांशी बोलून त्यांचाही विश्वास जिंकला.आरोपीने रणजी क्रिकेटमध्ये संधी मिळवून देण्यासाठी सुमारे १४ लाख रुपये खर्च येईल, असे सांगत पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार ८ नोव्हेंबर २०२३ पासून फिर्यादी व त्याच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या विविध खात्यांवर टप्प्याटप्प्याने पैसे ट्रान्सफर करण्यास केले. त्यांनी काजीच्या बॅंक खात्यात ९.९२ लाख रुपये पाठविले. 

कोल्लूचा मित्र राजकुंतला मुनिन्द्र (२४, नंद्याल, आंध्रप्रदेश) यानेदेखील १०.१० लाख रुपये काजीला पाठविले. मात्र त्यानंतर आरोपीने कुठलेही क्रिकेट ट्रायल्स आयोजित केले नाही व रणजी संघातदेखील संधी मिळवून दिली नाही. तो प्रत्येक वेळी टाळाटाळ करत होता. तक्रारदाराने पैसे मागितल्यावर त्याने फोन उचलणेदेखील बंद केले. कोल्लूने नागपूरमध्ये येऊन आरोपीचा शोध घेतला असता त्याचे घर बंद असल्याचे आढळून आले. तो वाराणसीला पळून गेल्याची माहिती मिळाली. कोल्लूच्या तक्रारीवरून पोलिसांनी तथाकथित कोच काजीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो कोच वगैरे नसून एका क्लबकडून तो क्रिकेट खेळायचा. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

Web Title : रणजी क्रिकेट घोटाला: दो युवाओं को ₹20 लाख का चूना

Web Summary : नागपुर के एक व्यक्ति ने क्रिकेट कोच बनकर आंध्र प्रदेश के दो युवाओं को रणजी के झूठे वादे कर ₹20.02 लाख ठगे। उसने ट्रायल और चयन के लिए पैसे लिए और गायब हो गया। पुलिस धोखाधड़ी की जांच कर रही है।

Web Title : Ranji Cricket Scam: Two Youths Duped of ₹20 Lakhs

Web Summary : A Nagpur man posing as a cricket coach cheated two Andhra Pradesh youths of ₹20.02 lakhs with false Ranji promises. He took money for trials and selection but vanished. Police are investigating the fraud.