Rajasthan Politics Crisis: राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा मुख्यमंत्री अशोक गहलोत करणार ‘The END’?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 11:55 AM2020-07-19T11:55:21+5:302020-07-19T11:58:30+5:30

राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील तणाव वाढल्याने काँग्रेस सरकारवर संकट निर्माण झालं, पक्षविरोधी कारवाया केल्यानं सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं.

सचिन पायलट यांनी अशोक गहलोत यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत काँग्रेसमध्ये बंडखोरी केली, त्यानंतर आपल्याला ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला, मात्र मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आमदारांचे शक्तीप्रदर्शन करत त्यांना दावा खोडून काढला.

राजस्थानमध्ये काँग्रेसचे १०७ आमदार आहेत, तर इतर काही अपक्षांचा पाठिंबा आहे, काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपा षडयंत्र रचत आहे असा आरोप मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला होता, तर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी असून भाजपाने आरोप फेटाळले होते.

सचिन पायलट यांनी मी कोणत्याही भाजपा नेत्यांच्या संपर्कात नसून मी भाजपात प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केले होते, पण अद्याप सचिन पायलट यांनी पुढची भूमिका जाहीर केली नाही, त्यामुळे अद्यापही राजस्थानमधील सत्तासंघर्षनाट्य सुरुच आहे.

अशातच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्र यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत असलं तरी, राज्यपालांना सध्याच्या स्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली, तसेच काँग्रेस सरकारकडे बहुमत असल्याचा दावाही केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांची ४५ मिनिटे बैठक चालली, यात समर्थक आमदारांचे पत्र अशोक गहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्र यांना सुपूर्द केलं. आवश्यकता भासल्यास सदनात बहुमत सिद्ध करु असंही मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यपालांना सांगितले.

ही मुलाखत अशावेळी घेतली जेव्हा विधानसभा अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह अन्य बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली आहे. या नोटीशीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सोमवारी याबाबत सुनावणी होणार आहे.

सध्यातरी सचिन पायलट यांच्याकडून कोणत्याही प्रकारची हालचाल सुरु नाही. त्यांनी मौन बाळगणं पसंत केले आहे. हरियाणातील एका रिसोर्टमध्ये पायलट समर्थक आमदार थांबले आहेत. तर काँग्रेस अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात आमदारांचे बहुमत असल्याचा दावा करत आहेत.

सचिन पायलट आणि १८ आमदारांनी काँग्रेसची बंडखोरी केल्याने गहलोत सरकार संकटात आहे. सध्या प्रत्येक आमदार महत्वाचा आहे. राजस्थानमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यासाठी १०१ आमदारांची गरज आहे. आता अशोक गहलोत यांच्याकडे १०३ आमदारांचे पाठबळ असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र जर अशोक गहलोत यांच्याकडे बहुमत असेल तर त्यांनी विधानसभेत ते सिद्ध करावं असं आव्हान पायलट गटाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे कदाचित बुधवारी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून आमदारांचे बहुमत असल्याचं सिद्ध करण्याची तयारी अशोक गहलोत यांनी केल्याची माहिती आहे.