राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार रांगेत ताटकळले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 09:38 AM2024-04-26T09:38:40+5:302024-04-26T10:04:27+5:30

Lok Sabha Election 2024 : ईव्हीएममध्ये बिघाड होताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

Technical failure in EVMs; Voters had to wait in Amravati, Akola, Wardhya, Lok Sabha Election 2024 | राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार रांगेत ताटकळले

राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार रांगेत ताटकळले

मुंबई :  महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अमरावती, अकोला आणि वर्ध्यात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर काही वेळ मतदारांना करावी लागली प्रतीक्षा लागली. ईव्हीएममध्ये बिघाड होताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अमरावती शहरातील रुक्मिणीनगर येथील शाळा क्रमांक १९ मधील खोली क्रमांक ५ मध्ये ईव्हीएम बंद पडले. जवळपास १५ मिनिटे वोटिंग मशीन बंद पडले होते. त्यामुळे मतदारांचा चांगलाच खोळंबा झाला होता. अखेर ईव्हीएममधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. सध्या अमरावतीमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. 

दुसरीकडे, अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. उमरा गावातील बुथ क्रमांक ३३३ मधील वोटिंग मशीन अचानक बंद पडलं. त्यामुळे साडेसात वाजेपर्यंत मतदानाला सुरुवात झालेली नव्हती. ईव्हीएम बदलण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. तसेच, नांदेडच्या माहूर तालुक्यातील टाकळी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. जवळपास १ तासापासून ईव्हीएम बंद पडल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून ईव्हीएममधील तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू आहे.

याचबरोबर, वर्ध्यात देखील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. वर्धा लोकसभेचे उमेदवार खासदार रामदास तडस हे परिवारासह देवळी येथील यशवंत कन्या माध्यमिक शाळेच्या १८५ क्रमांकाच्या केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदान करायला पोहोचले. अगदी सुरवातीलाच ईव्हीएम मशीन बंद पडल्याने येथील मतदान ४० मिनिट खोळंबले. सकाळी सव्वापाच वाजता संबंधित केंद्रावरील मशीन नादुरुस्त असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार मशीन दुरुस्त करण्यात आले होते. परंतु मतदान सुरवात झाल्यानंतर सुद्धा ही मशीन नादुरुस्त असल्याने खासदार तडस यांना थांबून राहावे लागले. त्यामुळे मतदारांची रांग लागली होती. ४० मिनिटानंतर सुरळीत सुरू झाले.

राज्यातील ८ लोकसभा जागांसाठी आज मतदान
महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान पार पडत आहे. पहिल्या टप्पात विदर्भातील ५ जागांवर मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात बऱ्याच लोकांना मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आज होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाला मतदार कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Web Title: Technical failure in EVMs; Voters had to wait in Amravati, Akola, Wardhya, Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.