दिल्लीत पैलवानांची धरपकड; व्हायरल फोटो पाहून अनेकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 06:39 PM2023-05-28T18:39:47+5:302023-05-28T19:04:04+5:30

देशातील लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या दिमाखात पार पडला. मोठा गाजावाज करत नवीन संसदेच्या सोहळ्याची चर्चा देशभर सुरू झाली.

देशातील लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या दिमाखात पार पडला. मोठा गाजावाज करत नवीन संसदेच्या सोहळ्याची चर्चा देशभर सुरू झाली.

तर, दुसरीकडे जंतर-मंतरवर आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता, आंदोलक पैलवानांची धरपकड होत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

नवीन संसद भवनासमोर धडकू पाहणाऱ्या आंदोलक पैलवानांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर पैलवांनाच्या आंदोलनस्थळी एकच राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

नवनिर्वाचित संसद भवनासमोर 'महिला महापंचायत' करण्याता इरादा असलेल्या पैलवांनाना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त असताना देखील आंदोलकांनी बॅरिकेट्स काढून संसद भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी, पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईदरम्यानचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि इतर कुस्तीपटूंची पोलीस धरपकड करत असल्याचे दिसून येते.

राजधानी दिल्लीतील या घटनेवरुन अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. देशासाठी मेडल जिंकणाऱ्या या कुस्तीपटूंचं कधीकाळी सर्वांनीच कौतुक केलं होतं, त्यांचा अभिमान बाळगला होता.

आता, या कुस्तीपटूंचा हा अवमान आणि त्यांच्यावर होत असलेली ही कारवाई अवमानजनक असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. काँग्रेस, राष्ट्रवादीसह सेलिब्रिटींनीही यावर मत व्यक्त केलंय.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केलाय. तर, स्वरा भास्कराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय.

सोशल मीडियात सध्या दिल्लीतील या घटनेचे फोटो व्हायरल होत असून कुस्तीपटू ट्रेंड करत आहेत. दरम्यान, विनेश फोगाटने नया भारत म्हणत घडल्या प्रकारावर संताप व्यक्त केलाय.