Russia-Ukraine crisis : रशिया-युक्रेन युद्ध झालं तर भारतात 'या' महत्वाच्या वस्तूंच्या किंमती वाढणार; बघा लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 01:00 PM2022-02-23T13:00:46+5:302022-02-23T13:12:48+5:30

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध झाले अथवा तणाव दीर्घकाळ टिकून राहिला, तर त्याचा थेट परिणाम भारतातील सर्वसामान्य नागरिकांवर होऊ शकतो.

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध झाले अथवा तणाव दीर्घकाळ टिकून राहिला, तर त्याचा थेट परिणाम भारतातील सर्वसामान्य नागरिकांवर होऊ शकतो. यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढू शकतात. नैसर्गिक वायूपासून ते गव्हापर्यंत विविध धान्यांच्या किमतीही वाढतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

रशिया-युक्रेन संकटामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 96.7 डॉलर वर पोहोचली आहे. सप्टेंबर 2014 नंतरचा हा उच्चांक आहे. रशिया हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे.

नैसर्गिक गॅसच्या किमती वाढणार - या संकटामुळे येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किंमतीत प्रति बॅरल 100 डॉर पेक्षा अधिक वाढ होऊ शकते. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम जागतिक जीडीपीवरही होईल. इंडिया टुडेच्या अहवालानुसार, जेपी मॉर्गनच्या विश्लेषणानुसार तेलाच्या किमतींमध्ये प्रति बॅरल 150 डॉलर एवढ्या वाढीमुळे जागतिक जीडीपी वाढ केवळ 0.9 टक्क्यांपर्यंत कमी होईल.

एलपीजी आणि केरोसिनवरील सब्सिडी वाढणार - कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने एलपीजी आणि केरोसिनवर सब्सिडी वाढणे अपेक्षित आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढणार - रशिया-युक्रेन संकट कायम राहिल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. याचा परिणाम चालू खात्यातील तुटीवर होईल.

गव्हाचीही किंमत वाढणार - जर काळ्या समुद्रात धान्य येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला, तर याचा किंमतीवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. रशिया हा जगातील अव्वल गहू निर्यातदार आहे तर युक्रेनचा चौथा क्रमांक लागतो. जागतिक एकूण गहू निर्यातीमध्ये दोन्ही देशांचा वाटा सुमारे एक चतुर्थांश एवढा आहे.

धातूंच्या किमतीवरही होऊ शकतो मोठा परिणाम - रशियावर निर्बंधांची शक्यता असतानाच, काही आठवड्यांत पॅलेडियम, ऑटोमोटिव्ह एक्झॉस्ट सिस्टिम आणि मोबाइल फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या धातूच्या किंमती वाढल्या आहेत.