हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:09 AM2024-05-20T11:09:52+5:302024-05-20T11:11:15+5:30

इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

Iranian President Ebrahim Raisi dies in helicopter crash The governor along with the foreign minister also lost their lives | हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव

हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव

Iran President Helicopter Crash ( Marathi News ) :इराणमध्ये रविवारी रात्री झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रेस्क्यू टीमने दुर्घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची पाहणी केली. मात्र या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असलेल्या सर्व जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्री अमीर अब्दुल्लाहियन, राज्यपाल मालेक रहमती आणि धार्मिक नेते मोहम्मद अली आले-हाशेम यांचाही समावेश आहे.

हेलिकॉप्टर दुर्घटनेत इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. "इब्राहिम रईसी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. भारत-इराणचे संबंध मजबूत करण्यात त्यांनी दिलेलं योगदान कायम लक्षात राहील. त्यांचे कुटुंब आणि इराणच्या नागरिकांप्रती माझ्या सहवेदना आहेत," अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच या कठीण प्रसंगात भारत हा इराणसोबत आहे, असा विश्वासही त्यांनी दिला आहे.

घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टला अपघात झाल्याचे वृत्त आल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आपली सुट्टी स्थगित करून ते आणीबाणीच्या बैठकीसाठी व्हाईट हाऊस येथे परतले आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांची हत्या झाली असण्याचा संशय अमेरिकेने व्यक्त केला आहे. 

इराणचे राष्ट्राध्यक्षइब्राहिम रईसी यांना घेऊन जात असलेलं एक हेलिकॉप्टर रविवारी पर्वतीय प्रदेशातून दाट धुक्यामधून मार्ग काढत असताना अपघातग्रस्त झालं होतं. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यामध्ये तीन हेलिकॉप्टर होते. त्यामधील दोन आपल्या निर्धारित ठिकाणी सुरक्षितरीत्या पोहोचले. मात्र एक हेलिकॉप्टर हे अपघातग्रस्त झालं. इराणच्या सरकारी टीव्हीने सांगितले की, ही दुर्घटना इराणच्या राजधानीपासून सुमारे ६०० किमी दूर अंतरावर असलेल्या अझरबैजान या देशाच्या सीमेवर असलेल्या जोल्फा या शहराजवळ घडली. 

दरम्यान, रईसी हे रविवारी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलियेव यांच्यासोबत एका धरणाचं उद्घाटन करण्यासाठी अझरबैजानमध्ये गेले होते. दोन्ही देशांनी असार नदीवर बांधलेले हे तिसरे धरण आहे. इराणचे ६३ वर्षीय राष्ट्राध्यक्ष रईसी हे कट्टरतावादी असून, त्यांनी इराणच्या न्यायपालिकेचं नेतृत्वही केलेलं आहे. रईसी हे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचे शिष्य मानले जातात.  

Web Title: Iranian President Ebrahim Raisi dies in helicopter crash The governor along with the foreign minister also lost their lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.