Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 12:28 PM2024-05-20T12:28:08+5:302024-05-20T13:17:37+5:30

Lok Sabha Elections 2024 : एटा येथील मतदान केंद्रावर एका व्यक्तीने दावा केला होता की, त्याने 8 वेळा मतदान केलं आहे. त्याने याचा एक व्हिडिओही बनवला होता, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Lok Sabha Elections 2024 Video etah polling booth person claimed vote 8 times Rahul Gandhi Slams BJP | Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील एटामध्ये एका व्यक्तीने 8 वेळा मतदान केल्याचा दावा केल्यानंतर आता संबंधित मतदान केंद्रावर पुन्हा एकदा मतदान होणार आहे. याच दरम्यान, मतदान करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याची शिफारस निवडणूक आयोगाने केली आहे. यासोबतच पोलिंग पार्टीच्या सर्व सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे.

एटा येथील या मतदान केंद्रावर एका व्यक्तीने दावा केला होता की, त्याने 8 वेळा मतदान केलं आहे. त्याने याचा एक व्हिडिओही बनवला होता, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे.

राहुल गांधी यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. "आपला पराभव समोर दिसू लागल्याने भाजपाला सरकारी यंत्रणेवर दबाव आणून लोकशाही धोक्यात आणायची आहे. काँग्रेस निवडणुकीचे कर्तव्य बजावणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांकडून ही अपेक्षा करते की, सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून घटनात्मक जबाबदारी विसरू नये, अन्यथा इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास त्यांच्यावर अशी कारवाई करण्यात येईल की, भविष्यात कोणीही ‘संविधानाच्या शपथेचा’ अवमान करण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एटा जिल्ह्यातील नयागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ वेळा मतदान करणाऱ्या व्यक्तीचे नाव राजन सिंह असं आहे. पोलिसांनी राजनला अटक केली आहे.

CEO ने दिले निर्देश

1. मतदान करणाऱ्या सर्व सदस्यांना निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

2. यूपीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी उर्वरित टप्प्यांमध्ये प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

व्हिडिओमध्ये तुफान व्हायरल

व्हिडिओमध्ये एक तरुण ईव्हीएमजवळ उभा आहे. या व्हिडिओमध्ये तो 8 वेळा मतदान केल्याचा दावा करत आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे निवडणूक आयोगाला हे चुकीचे वाटत असेल तर काहीतरी कारवाई करावी, अन्यथा… भाजपाची बूथ कमिटी ही खरं तर लूट कमिटी आहे, असं म्हटलं आहे.

समाजवादी पार्टीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करताना ही घटना निश्चितच बूथ कॅप्चरिंग दर्शवते. निवडणूक आयोगाने दखल घ्यावी. आरोपींवर योग्य ती कारवाई करावी असं म्हटलं आहे. 

Web Title: Lok Sabha Elections 2024 Video etah polling booth person claimed vote 8 times Rahul Gandhi Slams BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.