महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:22 AM2024-05-20T11:22:28+5:302024-05-20T11:27:54+5:30

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. त्याचवेळी संजय राऊतांनी राज ठाकरेंवर आक्रमक टीका केली आहे. 

Loksabha Election - Raj Thackeray name will not be in the history of Maharashtra; Sanjay Raut criticism | महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका

महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका

मुंबई - Sanjay Raut on Raj Thackeray ( Marathi News ) राज ठाकरेंना भेटीगाठीचे छंद पहिल्यापासून जडले आहेत. त्यामुळे कोण कोणाला भेटते, कोण कोणाकडे चहापानाला जातंय यावर चर्चा कशाला करता, यानिमित्त मनसे नेत्यांना महत्त्व मिळतंय. ते मिळू द्या. आमच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यांनी महाराष्ट्र लुटला या पक्षाचे नेते राज यांना भेटतात. याची इतिहासात नोंद राहील. महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही अशी जहरी टीका उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. 

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की,एकाबाजूला मुडदे पडलेत, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान रोड शो करतात हे किती असंवेदनशील आहे. राज ठाकरे, नारायण राणे यांना आम्ही रस्त्यावर उतरवलं. राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षासाठी इतकी मेहनत केली असती तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते. भाजपाने अनेकांना भाड्याने घेतले आहे. त्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय. मोदी-शाह यांनी काय महान दिवे लावलेत, ज्या मोदी-शाहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका असं आपण सांगत होता. त्यांच्या पखाल्या वाहताना आम्ही तुम्हाला पाहिलंय आम्हाला वाईट वाटलं. राज ठाकरे ज्यांना मतदान करणार तो डुप्लिकेट धनुष्यबाण आहे. तो बाळासाहेब ठाकरेंचा नाही. चोरीच्या मालावर ते हक्क सांगतायेत. चोरीच्या मालाचं चुंबन राज ठाकरे घेतायेत. ते नकली आहेत असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत आम्ही पंजावर मतदान करतो, हा पंजा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आहे. ज्या काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्यात सगळ्यात जास्त योगदान दिले आहे. ज्या कमळाबाईला आम्ही २५ वर्ष मतदान केले त्यांनी देशाची कशी वाट लावली, महाराष्ट्र कसा लुटला त्यामुळे आम्हाला महाविकास आघाडी म्हणून एकत्रित येऊन देश आणि संविधानासाठी हा निर्णय घ्यावा लागला. निशाणी कोणती हा प्रश्न नसून ही लढाई देश आणि संविधान वाचवण्याची आहे. उद्धव ठाकरे पंजाला मतदान करतायेत तसं काँग्रेसचे अनेक नेते मशाल, तुतारीवर मतदान करताना तुम्ही पाहाल असंही संजय राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, आम्हाला पराभवाची अजिबात भीती नाही. तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३५ पेक्षा जास्त जागा जिंकताना तुम्ही पाहाल. ज्यांना पराभवाची भीती वाटते ते पैशाचा आणि यंत्रणेचा दुरुपयोग करतायेत. आमच्याकडे पैसेच नाहीत असं संजय राऊतांनी म्हटलं. 

Web Title: Loksabha Election - Raj Thackeray name will not be in the history of Maharashtra; Sanjay Raut criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.