धावत्या वाहनांना लागतेय आग; तुम्ही काय खबरदारी घ्याल ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 18:26 IST2026-05-13T18:14:44+5:302026-05-13T18:26:48+5:30
वाढत्या उन्हामुळे राज्यात पारा ४५ अंशांच्या वर गेला. रस्त्यांवर वाहनांनी पेट घेण्याचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढले आहे. तांत्रिक बिघाड किंवा मानवी चुकांमुळे काही सेकंदात गाडीचा कोळसा होतो. वेळीच सावध झाल्यास मोठी जीवितहानी टाळता येऊ शकते. उन्हाळ्यात इलेक्ट्रीक वाहन चालविताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

वाहनातील बिघाडाचे संकेत : केबिनमध्ये जळल्यासारखा वास येणे, धूर निघताना दिसणे, डॅशबोर्डवरील 'इंजिन चेक' किंवा 'टेंपरेचर' लाइट लागणे, पिकअप सोडणे हे संकेत आहेत.

सिस्टीम लॉक झाल्यास काय कराल ? : आग लागल्यास अनेकदा सेंट्रल लॉकिंग सिस्टीम जॅम होते आणि दरवाजे उघडत नाहीत. यावेळी घाबरून न जाता सीटबेल्ट कटर किंवा जड वस्तूने खिडकीची काच फोडा, काच फोडताना कोपन्यावर जोरात प्रहार करा, मध्यभागी नाही, गाडीत नेहमी 'लाइफ हॅमर' किंवा अग्निशमन यंत्र ठेवायला हवे.

काय काळजी घ्याल ? : गाडीचे सर्व्हिसिंग वेळेवर करा आणि फक्त अधिकृत शोरुममध्येच वायर चेक करा, उन्हाळ्यात सलग २-३ तास गाडी चालवल्यानंतर १५ मिनिटे ब्रेक द्या, गाडीत कधीही ज्वलनशील पदार्थ (पेट्रोल कॅन, लायटर, परफ्यूम स्प्रे) ठेवू नका, टायरमधील हवेचा दाब योग्य ठेवा, घर्षणामुळेही उष्णता वाढते.

इमर्जन्सीत मदत कुठे मागाल ? : अग्निशमन दल - १०१, पोलिस - १००/११२, रुग्णवाहिका - १०८ , हायवे हेल्पलाइन - १०३३

ईव्ही व गॅसवरील वाहनांना जास्त धोका : ईव्ही वाहनातील लिथियम बॅटरी तापल्यास 'केमिकल फायर' लागते, जी विझवणे कठीण असते. बॅटरीला इजा झाल्यास तातडीने तपासणी करायला हवी. 'सीएनजी' किंवा 'एलपीजी' वाहनातील गॅस किटचे हायड्रो-टेस्टिंग वेळेवर करायला हवे.

वाहनांना आग लागण्याची प्रमुख कारणे - शॉर्टसर्किट : अनधिकृत वायरिंग किंवा निकृष्ट दर्जाच्या अॅक्सेसरीज बसवणे, इंधन गळतीः इंधन पाइपला तडे जाणे किंवा गळती होणे, ओव्हरहिटिंग : कुलंटची पातळी कमी होणे किंवा फॅन बंद पडणे, बॅटरी बिघाड : बॅटरीच्या टर्मिनल्समध्ये घर्षण होऊन ठिणगी पडणे, रेंट बाइट (उंदरांनी वायर कुरतडणे) : यामुळे वायर्स उघड्या पडतात आणि स्पर्श होताच आग लागते.

















