Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 08:58 IST2026-05-14T08:55:37+5:302026-05-14T08:58:09+5:30
Prateek Yadav Death News: फिटनेस आयकॉन प्रतीक यादव यांचे वयाच्या ३८व्या वर्षी निधन झाल्याने यादव कुटुंबासह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह याचे सुपुत्र प्रतीय यादव यांचा बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रतीक यादव यांनी वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले. याच पार्श्वभूमीवर प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? याची माहिती समोर आली आहे.
घरातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव यांची तब्येत बिघडली, तेव्हा त्यांच्या दोन्ही मुली घरातच होत्या आणि त्यांच्या पत्नी पत्नी अपर्णा यादव या एका शपथविधी समारंभासाठी आसामध्ये गेल्या होत्या. मंगळवारी सांयकाळी अपर्णा यादव यांना प्रतीक यादव यांची तब्येत बिघडल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर अपर्णा यांनी वारंवार फोन करून प्रतीक यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि संपर्कात राहिल्या. मंगळवारी सायंकाळी साधारण ६.०० वाजण्याच्या सुमारास अपर्णा यांनी पुन्हा फोन केला असता प्रतीक हे त्यांच्या खोलीत विश्रांती घेत असल्याचे सांगण्यात आले. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास अपर्णा यादव यांनी पुन्हा फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, प्रतीक यादव हे झोपले असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.
प्रतीक यादव बुधवारी पहाटे ५:०० च्या सुमारास त्यांच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे लक्षात येताच, तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला कळवण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमधून एक आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले. घटनास्थळी पोहोचून तपासणी केली असता, डॉक्टरांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर, प्रतीक यांना ताबडतोब सकाळी ६.०० वाजताच्या सुमारास रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
डॉक्टरांच्या मते, त्यांच्या शरीरात हालचालीचे कोणतेही लक्षण नव्हते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव गेल्या तीन ते चार दिवसांपासून घरीच होते. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामुळे त्यांना चालण्या-फिरण्यात सतत अडचण येत होती. त्यांना ३० एप्रिलला मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर तीन दिवस उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा दिसून आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.