CNG Price Hike: मुंबई महानगर क्षेत्रातील लाखो वाहनधारकांसाठी चिंतेची बातमी आहे. महानगर गॅस लिमिटेडनं (MGL) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ १४ मे २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून लागू करण्यात आली आहे.
या दरवाढीनंतर मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये सीएनजीचा सुधारित दर आता ८४ रुपये प्रति किलो झाला आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष आणि जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता यामुळे गॅस खरेदीच्या खर्चात वाढ झाल्याचं स्पष्टीकरण कंपनीनं दिलंय.
"भू-राजकीय तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. यासोबतच महागड्या गॅस स्रोतांवरील वाढतं अवलंबित्व, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचं झालेलं अवमूल्यन यामुळे गॅस खरेदीचा खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे. याच कारणांमुळे किमतीत सुधारणा करणे आवश्यक झालं आहे," असं महानगर गॅसनं निवेदनाद्वारे म्हटलंय.
पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक स्तरावर दरवाढ
इराणमधील संघर्षामुळे पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत, ज्याचा थेट परिणाम आता मुंबईकरांच्या खिशावर होताना दिसतोय. मुंबईत सीएनजीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, या दरवाढीचा थेट परिणाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर होऊ शकतो. एमजीएलच्या आकडेवारीनुसार, मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे १२.८ लाख वाहनं सीएनजीवर चालतात. यामध्ये साधारण ४.७० लाख रिक्षा, १.६० लाखांहून अधिक टॅक्सी आणि ५ लाखांहून अधिक खाजगी कारचा समावेश आहे.
