India LPG Tanker: मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसने भरलेल्या 'एमव्ही सनशाईन' या जहाजाने अत्यंत संवेदनशील मानली जाणारी 'होर्मुझची सामुद्रधुनी' सुरक्षितपणे पार केली असून, आता हे जहाज भारताच्या दिशेने रवाना झाले आहे.
भारतीय नौदल आणि इतर सुरक्षा यंत्रणा या जहाजाला सातत्याने सुरक्षा कवच पुरवत आहेत. विशेष म्हणजे, या युद्धग्रस्त आणि संवेदनशील भागातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेले हे १५ वे एलपीजी जहाज आहे.
India-bound LPG tanker MV Sunshine crossing Strait of Hormuz; Indian Navy, agencies provide all support: Sources
— ANI Digital (@ani_digital) May 13, 2026
Read @ANI Story I https://t.co/KaEKRHZDTm#StraitofHormuz#MVSunshine#IndianNavy#LPGTankerpic.twitter.com/34qgybjuWJ
बुधवारी रात्री पार केला धोकादायक पट्टा
वृत्तसंस्था 'एएनआय'ने दिलेल्या माहितीनुसार, एमव्ही सनशाईन या जहाजाने बुधवारी (१३ मे २०२६) रात्री उशिरा होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीरीत्या पार केली. पर्शियन आखातातून बाहेर पडल्यानंतर आता हे जहाज भारतीय किनारपट्टीकडे येत आहे.
भारतीय नौदलाची युद्धनौका या जहाजावर २४ तास देखरेख ठेवून आहे. या जहाजात नेमका किती गॅस साठा आहे, याची अधिकृत आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही, मात्र भारताच्या ऊर्जा पुरवठ्यासाठी हे जहाज अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
ऊर्जा पुरवठा विस्कळीत होऊ देणार नाही: हरदीप सिंह पुरी
देशाचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या घडामोडीवर भाष्य करताना सांगितले की, "पश्चिम आशियातील भीषण तणावानंतरही भारताने आपली ऊर्जा पुरवठा साखळी अत्यंत कुशलतेने हाताळली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा फटका देशातील सामान्य जनतेला बसू नये, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पुरवठ्यात कोणतीही तूट भासू नये म्हणून देशांतर्गत एलपीजी उत्पादनातही वाढ करण्यात आले आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
इराणची भूमिका...
दुसरीकडे, इराणनेही होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. इराणचे उप परराष्ट्र मंत्री काझेम घरीबाबादी यांनी बुधवारी सांगितले की, "जर या भागात शांतता प्रस्थापित झाली, तर होर्मुझची स्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली होईल. आम्ही आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करणार नाही. परिस्थिती सामान्य झाल्यास अधिक सुरक्षा आणि स्थिरता पाहायला मिळेल."
इराणने यावेळी भारताच्या भूमिकेचेही कौतुक केले. 'ब्रिक्स' देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी घरीबाबादी यांनी नमूद केले की, भारत नेहमीच शांततेचा पुरस्कर्ता राहिला असून तणाव कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो.
