Sunetra Ajit Pawar: काटेवाडीची सून ते राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवारांचा 'हा' प्रवास एकदा वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 17:20 IST2026-01-31T17:03:57+5:302026-01-31T17:20:14+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. अजित पवारांच्या जागी आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पक्षासह राज्याची सुत्रे हाती घेतली आहे. राज्यात पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आहे. समाजसेवेतून सुरू झालेला सुनेत्रा पवारांचा हा प्रवास राजकारणाच्या निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचला आहे.

तळागाळातील सामाजिक उपक्रमापासून संसदेच्या सभागृहानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदापर्यंत असा त्यांचा प्रवास झाला आहे. अजित पवारांच्या अकाली निधनाने सुनेत्रा पवारांना धाडसाने पुढे येत ही मोठी जबाबदारी पेलावी लागणार आहे. सुनेत्रा पवारांचं समाजकारण आजपर्यंत अनेकांना माहिती आहे. परंतु राजकारणाच्या पटलावर त्यांच्या नेतृत्व गुणाची कसोटी खऱ्या अर्थाने आता लागणार आहे.

बारामती आणि आसपासच्या परिसरात सुनेत्रा पवारांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. सामाजिक भान जपत सुनेत्रा पवारांनी पर्यावरण संवर्धनासोबत महिला सबलीकरण आणि शैक्षणिक विकासावर कायम लक्ष केंद्रीत केले. एकीकडे अजित पवार राज्याची जबाबदारी सांभाळत होते तर दुसरीकडे सुनेत्रा पवार त्यांच्या समाजसेवेतून त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा बारामतीत उमटवत होत्या.

राजकारणातील अनेक महिलांप्रमाणेच सुनेत्रा पवार यांनाही राजकारणात येताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. पती अजित पवारांना साथ देत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली. त्यात त्यांना टीकेचे बाणही सहन करावे लागले. मात्र वक्तृत्वापेक्षा कृतीने त्यांनी राजकीय काम सुरू ठेवले.

सुनेत्रा पवार यांचा प्रवास खऱ्या अर्थाने पर्यावरणाच्या आवडीमुळे एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया (EFI) च्या स्थापनेनंतर सुरू झाली. हे असं व्यासपीठ होते जिथे पर्यावरण जागरुकता, पर्यावरणपूरक अभियान यासाठी काम करत होते. त्यातून वृक्षारोपणापासून इको व्हिलेजपर्यंत संकल्पना त्यांनी अंमलात आणल्या. ज्याचे दिर्घकाळ आणि शाश्वत परिणाम निर्माण केले.

पर्यावरणासोबतच महिला सबलीकरणासाठी सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतला. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केले. त्यातूनच कौशल्य विकास उपक्रम, महिला बचत गट, कल्याणकारी योजना यातून सुनेत्रा पवार यांनी ग्रामीण आणि निमशहरी भागात दुर्बळ महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने काम केले.

बारामती टेक्सटाइल कंपनी ही सुनेत्रा पवार यांच्याच नेतृत्वाखाली विस्तारत गेली. याठिकाणी त्या अध्यक्षा म्हणून काम करतात. ही केवळ एक कंपनी नाही तर ते शेकडो महिलांसाठी उपजीविकेचे साधन बनले आहे. महिला सन्मान, स्थिरता आणि आर्थिक सुरक्षा देण्याचं काम यातून झाले. महिलांना पुढे आणण्यासोबतच त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी मोठा हातभार लावला.

बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यात शरद पवारांनंतर अजित पवार हेच बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी शेवटपर्यंत काम करत राहिले. त्यात पायाभूत सुविधांसोबत शिक्षण, उद्योग यामुळे बारामतीच्या विकासाला गती मिळाली. त्यात सुनेत्रा पवार यांनी इको टुरिझम आणि पर्यावरण, महिला सक्षमीकरण यातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

अजित पवार यांच्या हयातीत सुनेत्रा पवार राजकारणापेक्षा समाजकारणातच जास्त रमल्या. त्यांच्या कामांना व्यापक प्रसिद्धी मिळाली. कुटुंब सांभाळत सुनेत्रा पवारांनी बारामतीत आपल्या कामाचा ठसा उमटवला. २०२४ मध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्याची संधी मिळाली. काहींनी त्यांच्यावर टीका केली परंतु त्यांच्या सामाजिक कार्याने अनेकांनी त्यांचे कौतुकही केले आहे.

आज अजित पवारांच्या अकाली जाण्यानं सुनेत्रा पवार यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला आहे. या परिस्थितीतही त्यांनी स्वत:ला सावरत पक्ष संघटनेने दिलेली जबाबदारी स्वीकारली आहे. गावांमध्ये झाडे लावण्यापासून ते राज्यसभेत विविध धोरणांवर चर्चा करण्यापर्यंत आणि आता काटेवाडीची सून ते महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार असा त्यांचा प्रवास झाला आहे.