बापरे! इंस्टाग्रामवर फोटो अपलोड केले म्हणून 'या' दांपत्याला तुरुंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 06:53 PM2020-05-05T18:53:52+5:302020-05-05T19:30:41+5:30

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या इराणमधील एका दांपत्याला येथील कोर्टाने १६ वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

अहमद मोईन शिराजी आणि त्यांची पत्नी शबनम शाहरोखी यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, हे दोघेही २०१९ मध्ये इराण सोडून तुर्कीला गेले आहे. मात्र, ही शिक्षा त्यांच्या अनुपस्थितीत सुनावली आहे.

शिराजी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले होते की, त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर सरकारविरोधात मोहीम, सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणे आणि नैतिक भ्रष्टाचार पसरविण्याचा आरोप लावण्यात आले आहेत.

शिराजी आणि त्यांची पत्नी शबनम सध्या आपल्या दोन मुलांसमवेत तुर्कीमध्ये राहत आहेत. शिराजी यांनी सांगितले की, इराणमधील कोर्ट आम्हाला कोणत्याही प्रकारे दोषी ठरवू इश्चित आहे. यासाठी आम्ही स्वतः इराण सोडण्याचा निर्णय घेतला.

शिराजी हे माजी किक बॉक्सिंग चॅम्पियन आणि उद्योजक आहेत. इंस्टाग्रामवर शिराजी यांचे दीड लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

शिराजी यांना नऊ वर्षांची शिक्षा तर त्यांच्या पत्नीला सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, तीन महिने वेतनाशिवाय मजुरी करण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या दांपत्याला त्यांच्या वकीलांकडून कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेबद्दल समजले. ते म्हणाले की, कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही आमच्या वकीलामार्फत अपील करु. तसेच, याआधीही गुप्तचर मंत्रालयाने आम्हाला अनेकदा समन्स बजावले, असे शिराजी यांनी म्हटले आहे.

चौकशी करणार्‍यांनी मला सोशल मीडियावर पत्नीची हिजाबशिवाय फोटो पोस्ट न करण्यास सांगितले होते. तसेच, सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटीपासून दूर राहण्यास सांगितले होते, असे शिराजी यांनी सांगितले.

अहमद मोईन शिराजी आणि त्यांची पत्नीचे इंस्टाग्रामवर वेगवेगळे प्रोफाइल आहे. हे दोघेही स्वतःचे आणि मुलांचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असतात.

फोटोंशिवाय शबनम शाहरोखी आपल्या व्यायामाचे आणि बॉक्सिंगचे अनेक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर अपलोड करत असते. शबनमने सोशल मीडियावर गरोदरपणा, मुले आणि तिची राजकीय विचारसरणी याबद्दल बरेच काही लिहिले आहे.