coronavirus: रशियाने खरोखरच विकसित केली कोरोनावरील लस? WHO म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 11:19 AM2020-08-05T11:19:56+5:302020-08-05T11:34:48+5:30

लवकरात लवकर कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत रशियाने बाजी मारल्याची चर्चा सुरू आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे सध्या जग खूप चिंतेत आहे. अशा परिस्थितीत रशियाने ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाच्या लसीच्या उत्पादनास सुरुवात करणार असल्याचे सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. लवकरात लवकर कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत रशियाने बाजी मारल्याची चर्चा सुरू झाली. आता जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

कोरोनावरील लसीच्या उत्पादनासोबतच या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीही सुरू राहील, असे रशियाने म्हटले होते. दरम्यान, आता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनावरील लस विकसित करण्याच्या रशियाच्या दाव्यावर शंका उपस्थित केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनावरील लसीच्या उत्पादनासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची सूचना रशियाला केली आहे.

रशिया ऑक्टोबर महिन्यापासून कोविक-१९विरोधात व्यापक प्रमाणावर लसमोहीम सुरू करणार असल्याची माहिती रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराश्को यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. तसेच ही लस पूर्णपणे मोफत असेल आणि डॉक्टर्स आणि शिक्षकांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाईल. त्याबरोबरच या लसीची चाचणीही सुरू राहणार असून, त्यात सुधारणा करण्याचे प्रयत्नही होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अशा प्रकारच्या बातम्या जेव्हा जेव्हा येतील तेव्हा आपल्याला सावधगिरी बाळगणे आवश्यक असेल, असे डब्ल्यूएचओचे प्रवक्ते क्रिस्टियन लिंडमियर यांनी सांगितले.

लिंडमियर म्हणाले की, आपण महत्त्वपूर्ण शोध घेतल्याचा दावा जेव्हा संशोधक करतात तेव्हा ती खरोखरच चांगली बातमी असते. मात्र चाचण्यांच्या अनेक टप्प्यांमधून गेल्यानंतर दावा आणि वास्तव यात फरक दिसून येतो. आम्हाला रशियाच्या लसीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. जर अधिकृतरीत्या काही समजले असते तर आमच्या युरोपमधील कार्यालयातील सहकाऱ्यांनी त्यावर लक्ष दिले असते.

सुरक्षितरीत्या लस विकसित करण्याचे काही नियम आहेत आणि त्यासंदर्भात एक मार्गदर्शक तत्त्वदेखील आहे. त्याचे पालन झाले पाहिजे, असेही जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले.

मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यामुळेच आपल्याला संबंधित उपचार किंवा लसीमुळे काही अपाय होतात का किंवा याच्या वापरामुळे फायद्यापेक्षा नुकसान अधिक होते का याची माहिती मिळू शकते.

जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या संकेतस्थळावर वैद्यकीय चाचण्यांमधून जात असलेल्या २५ लसींची सूची तयार केली आहे. तर उर्वरित १३९ लसी या प्री-क्लीनिकल टप्प्यात आहेत. सध्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मोजक्याच लसींचा समावेश झाला आहे. मात्र यामध्ये रशियाने विकसित केलेल्या लसीचा समावेश करण्यात आलेला नाही. आतापर्यंत ब्रिटनमधील ऑक्सफर्ड, अमेरिकेतील मॉडर्ना आणि चीनमधील सिनोव्हॅक या लसी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीपर्यंत पोहोचल्या आहेत.

तर रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सेचेनोव्ह मेडिकल विद्यापीठाने १८ जून रोजी या लसीची पहिली चाचणी घेतली. तर २३ जून रोजी दुसरी चाचणी घेतल्याचा दावा केला आहे. मात्र या लसीसाठीचे संशोधन आणि टाइम फ्रेम पाहता ही लस पहिल्या टप्प्यातच असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

कुठल्याही आजारावरील लस विकसित करणे ही दीर्घकालीन प्रक्रिया असते. लस बाजारात आणण्यापूर्वी ती पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही याचीही पडताळणी केली जाते. कधीकधी या प्रक्रियेला १० वर्षेसुद्धा लागतात.

दरम्यान, कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी घाई करण्यात येऊ नये.लसीमध्ये झालेली किरकोळ चूक लाखो लोकांच्या जीवावर बेतू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत किंवा २०२१ च्या सुरुवातीला कोरोनावरील लस येईल, असा दावा अनेक संशोधकांनी केला आहे.

Read in English