बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:36 IST2026-05-18T13:31:39+5:302026-05-18T13:36:11+5:30
Investing Tips and Tricks: शेअर बाजारातील चढ-उतार आपण डोळ्यांनी पाहू शकतो, पण कंपन्यांच्या अंतर्गत कारभारात होणारी अफरातफर किंवा 'कॉपॅर्पोरेट गव्हर्नन्स'चा अभाव हा एक सुप्त धोका आहे. समजून घ्या काय करायला हवे?

अनेकदा कंपन्या वरून चकाचक दिसतात, पण आतून त्या पोखरलेल्या असतात. 'सेबी'च्या आदेशांचे विश्लेषण केले असता, गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी कंपन्या प्रामुख्याने पाच प्रकारचे सापळे रचत असल्याचे समोर आले आहे.

जाळ्यात फसू नका :- काही कंपन्या नवीन भांडवल आल्याचा बनाव करतात. प्रत्यक्षात, तोच पैसा वेगवेगळ्या खात्यांतून फिरवून नवा गुंतवणूकदार आल्याचे दाखवले जाते. महसूल नसतानाही शेअर्सच्या किमती वाढवून सामान्यांना जाळ्यात ओढले जाते.

कवडीमोल भाव :- नफा कमावून देणारे युनिट्स कंपन्यांना कमी किमतीत विकल्या जातात. ब्रँड व्हॅल्यू आणि भविष्यातील कमाईकडे दुर्लक्ष करून मालमत्तेचे मूल्य मुद्दाम कमी दाखवले जाते, ज्यामुळे सर्वसामान्य भागधारकांचे मोठे नुकसान होते.

फुगवटा ओळखा :- काही कंपन्या मोजक्या लोकांच्या मदतीने शेअर्सचे ११ ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढवतात. कमी लिक्विडिटी असलेल्या शेअर्समध्ये वारंवार अप्पर सर्किट लावून किमती वाढवल्या जातात. किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हे उद्योग केले जातात.

निधीचा गैरवापर :- ज्या कारणासाठी कर्ज किंवा आयपीओ यांद्वारे पैसा उभारला जातो, तो तिथे न वापरता इतरत्र वळवला जातो. बनावट व्हेंडर्स किंवा अज्ञात संस्थांना पैसे ट्रान्सफर करून तो निधी शेवटी प्रवर्तकांकडेच फिरवला जातो.

नफ्याचे आकडे :- खर्च कमी आणि नफा जास्त दाखवण्यासाठी ताळेबंदात फेरफार केली जाते. तोटा लपवून तो इतर उत्पन्न म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होतो. कॅश फ्लो नसतानाही प्रचंड नफा दाखवला जातो.

हे नक्की कराल :- गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीच्या 'कॅश फ्लो' स्टेटमेंटची नीट तपासणी करा. प्रवर्तकांचे व्यवहार, वारंवार होणारे मोठे व्यवहार आणि व्यवस्थापनातील पारदर्शकता तपासा. जोपर्यंत नियामक संस्था हस्तक्षेप करतात, तोपर्यंत उशीर झालेला असतो, त्यामुळे सतर्क राहणे हाच एकमेव उपाय आहे.
















