भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 14:38 IST2026-05-15T14:31:55+5:302026-05-15T14:38:27+5:30

Global Oil Crisis: इराण संकटामुळे इंधनाचा भडका! पाकिस्तानात-बांग्लादेशात परिस्थिती हाताबाहेर गेली!

Global Oil Crisis: पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाची पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली आहे. जगातील एकूण कच्च्या तेलापैकी तब्बल २० टक्के वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. या मार्गात अडथळे आल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ७०-७५ डॉलरवरून थेट १०० डॉलरच्या पार गेले आहेत. या जागतिक संकटाचा सर्वाधिक फटका भारताच्या शेजारील देशांना बसला असून, तिथे पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

पाकिस्तान- पाकिस्तानमधील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. गेल्या ३ महिन्यांत तिथे पेट्रोल ६४% आणि डिझेल ६१% महागले आहे. तिथे सध्या पेट्रोल ४५८.८६ पाकिस्तानी रुपये आणि डिझेल ५२०.४२ पाकिस्तानी रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. (भारतीय चलनानुसार पेट्रोल ₹१५७.३४ आणि डिझेल ₹१७८.४५ प्रति लिटर). दरम्यान, इंधन आणि वीज वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकारने देशात आठवड्यातून केवळ ४ दिवस काम करण्याचा नियम लागू केला आहे, तसेच अनेक शाळाही बंद करण्यात आल्या आहेत.

नेपाळ- नेपाळ हा सध्या दक्षिण आशियामध्ये सर्वात महाग पेट्रोल विकणारा देश बनला आहे. पूर्णपणे आयातीवर अवलंबून असलेल्या नेपाळमध्ये एप्रिल २०२६ मध्ये एकाच महिन्यात तब्बल ४ वेळा दरवाढ करण्यात आली. जानेवारीत १३७ नेपाळी रुपये असलेले पेट्रोल आता २१९ नेपाळी रुपयांवर (भारतीय चलनानुसार ₹१२३.५८) गेले आहे. विशेष म्हणजे, नेपाळमध्ये ६०% इंधन वाहतूक क्षेत्रात वापरले जाते. त्यामुळे मालवाहतूक महागल्याने तेथील अन्नधान्य आणि रोजच्या वस्तूंचे भाव कडाडले आहेत.

श्रीलंका- मार्च २०२६ मध्ये श्रीलंकेत आशियातील सर्वात मोठी इंधन दरवाढ झाली. तिथे ऑटो डिझेल २६.१ टक्क्यांनी वाढून ३८२ रुपयांवर गेले आहे. श्रीलंकेत सध्या पेट्रोल ३९८ श्रीलंकाई रुपये (भारतीय चलनानुसार ₹१०८.५५) प्रति लिटर झाले आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सरकारने इंधनाचे 'रेशनिंग', म्हणजेच कोणालाही गरजेपेक्षा जास्त तेल दिले जात नाहीये. इंधन वाचवण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे.

बांगलादेश- आपल्या गरजेच्या ९५% तेल आयात करणाऱ्या बांगलादेश सरकारला अखेर सबसिडीचा भार न पेलवल्यामुळे एप्रिल २०२६ मध्ये १० ते १६ टक्क्यांनी दर वाढवावे लागले. सध्या तिथल्या अनेक जिल्ह्यांतील पेट्रोल पंप कोरडे पडले असून, तेलासाठी लोकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे.

भारताने संकटाचा कसा सामना केला? शेजारी देशांमध्ये इंधनाचे दर ६० टक्क्यांपर्यंत वाढले असताना, भारताची स्थिती मात्र स्थिर आणि नियंत्रणत आहे. १५ मे २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतात पेट्रोलमध्ये केवळ ३.१४ रुपये (३.४%) आणि डिझेलमध्ये ३.११ रुपये (३.६%) इतकीच किरकोळ वाढ झाली आहे.