Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 11:36 IST2026-05-15T09:52:39+5:302026-05-15T11:36:33+5:30
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
15 May, 26 : 11:49 AM
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ
जगातील दोन महासत्तांचे नेते जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. सध्या बीजिंगमध्ये सुरू असलेल्या ऐतिहासिक शिखर परिषदेतही असेच काहीसे घडले. मात्र, यावेळी चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेबद्दल काढलेले उद्गार आणि त्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली अनपेक्षित संमती. "अमेरिका हा रसातळाला जाणारा देश आहे," अशा शब्दांत जिनपिंग यांनी अमेरिकेची कानउघडणी केली आणि विशेष म्हणजे ट्रम्प यांनीही यात त्यांचे १०० टक्के समर्थन केले आहे.
15 May, 26 : 11:47 AM
जळगावात कांद्याला मातीमोल भाव; ट्रॅक्टर भाडंही निघेना, शेतकऱ्यांमध्ये संताप
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे पोटच्या गोळ्याप्रमाणे जीव लावून मार्केटमध्ये आणलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला अवघे १ रूपया ५० पैसे प्रति किलो प्रमाणे भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. किंबहुना ट्रॅक्टर भाडाही निघत नसल्याने पोशिंदा हवालदिल झाले आहे. दरम्यान एकाच शेतकऱ्यांच्या कांद्याला दोन भाव मिळत असून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. अशी तक्रार करून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्या का? असे संतप्त सवाल देखील शेतकऱ्यांनी उपस्थित केले आहे.
15 May, 26 : 11:35 AM
'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि इतर वस्तूंच्या किंमती वाढल्यानंतर विरोधक केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केंद्र सरकारला घेरले. ते म्हणाले, "महागाईच्या काळात मोदींनी लोकांवर आसूड उगारला आहे. पेट्रोल-डिझेल प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले आहे. तर सीएनजीचे दरही २ रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. निवडणूक संपताच मोदींची वसुली सुरू झाली आहे.'
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही सरकारवर टीका करताना म्हटले की, 'निवडणुका संपताच भाजपा सरकारने जनतेला महागाईची आणखी एक भेट दिली आहे. पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी महागले आहे. लोक आधीच महागड्या गॅस, वीज बिलामुळे त्रस्त आहेत. आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून सरकारने लोकांचे कंबरडेच मोडले आहे. आता भाजपा नकोच.'
15 May, 26 : 11:16 AM
सोलापुरातील मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा अपघात
सोलापूर : सोलापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला. या अपघातात त्याची गाडी चक्काचूर झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. या अपघातात दिलीप धोत्रे हे गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
15 May, 26 : 11:15 AM
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन
ठाणे - डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज १५ मे रोजी पहाटे ४.३० ते ५ वाजण्याच्या दरम्यान दुख:द निधन झाले. त्यांचे वय 68 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. मागील आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तब्येतीसंदर्भात काही गुंतागुंत निर्माण झाली होती. शस्त्रक्रियेनंतर ते बरे झाले परंतु अचानक त्यांची प्राणज्योत मालवली.
15 May, 26 : 10:25 AM
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक
पश्चिम आशियातील युद्ध परिस्थिती, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे देशातील महागाईचा दबाव आणखी तीव्र झाला आहे. एप्रिल २०२६ मध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर तब्बल ८.३ टक्क्यांवर पोहोचला असून, हा मागील ४२ महिन्यांतील उच्चांक ठरला आहे. मार्चमध्ये हा दर केवळ ३.८८% होता.
अधिकची माहिती वाचा
15 May, 26 : 10:23 AM
नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. २१ जून २०२६ रोजी नीट परीक्षा देशभरात घेतली जाणार आहे. यापूर्वी घेण्यात आलेली नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आली. दरम्यान, परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याने एकूण परीक्षा घेणाऱ्या एनटीए संस्थेच्या कामावरच शंका उपस्थित होत आहे.
सविस्तर वाचा
15 May, 26 : 10:21 AM
मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
Monsoon Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून १६ मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचण्याची शक्यता आहे. जर हाच वेग कायम राहिला, तर मान्सून १ जून रोजी केरळमध्ये पोहोचेल आणि तेथून महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागांकडे पुढे सरकेल. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा वेग वाढला आहे.
15 May, 26 : 10:07 AM
फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढत्या तणावामुळे जागतिक तेल पुरवठा धोक्यात आला असताना, भारताने आपली ऊर्जा सुरक्षा सुरक्षित करण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत. रशियाकडून सवलतीच्या दरात मिळणाऱ्या तेलाची आयात सुरू ठेवण्यासाठी भारताने अमेरिकेकडे मुदतवाढीची विनंती केली आहे. १६ मे रोजी संपणाऱ्या या सवलतीच्या मुदतीपूर्वीच रशियाकडून होणारी आयात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. (सविस्तर वाचा)
15 May, 26 : 10:06 AM
पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत
जागतिक ऊर्जा संकट गडद होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून आपल्या सहा दिवसांच्या पाच देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याला सुरुवात करत आहेत. १५ मे रोजी पंतप्रधान सर्वप्रथम संयुक्त अरब अमिरातीला भेट देतील. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर घातलेली नाकेबंदी आणि अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेली अस्थिरता पाहता, भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे हा या दौऱ्याचा मुख्य अजेंडा असणार आहे. (सविस्तर वाचा)