पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 11:18 IST2026-05-15T11:18:07+5:302026-05-15T11:18:50+5:30
Mumbai Murder: मुंबईतील गोरेगाव परिसरातील आरे कॉलनीमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
मुंबईतीलगोरेगाव परिसरातील आरे कॉलनीमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. पत्नीच्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरून एका पतीने तिच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावले, त्याच्यासोबत मद्यप्राशन केले आणि त्यानंतर पत्नीच्या डोळ्यांदेखतच त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या थरारक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भीमराज ओमप्रकाश शर्मा (वय, ४८) याला आपल्या पत्नीचे अशोक भुसारे नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. भीमराजने अनेकदा अशोकला आपल्या पत्नीपासून दूर राहण्याची ताकीद दिली होती. मात्र, ताकीद देऊनही दोघांचे भेटणे आणि बोलणे सुरूच होते. यामुळे भीमराजच्या मनात प्रचंड राग होता. बुधवारी भीमराजने अशोकला संपवण्याचा कट रचला. त्याने अशोकला विश्वासात घेऊन पार्टी करण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले. घरात भीमराजची पत्नीही उपस्थित होती. भीमराज आणि अशोक या दोघांनी मिळून मद्यप्राशन केले. दारूच्या नशेत त्यांच्यात पुन्हा एकदा जुन्या वादावरून बाचाबाची सुरू झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात भीमराजने धारदार शस्त्र काढून अशोकचा गळा चिरला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
हत्येनंतर आरोपी भीमराज शर्मा घटनास्थळावरून पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या तीन तासांत पोलिसांनी भीमराजचा शोध काढून त्याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.