Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 11:42 IST2026-05-15T11:16:35+5:302026-05-15T11:42:21+5:30
सरकारी तेल कंपन्यांनी चार वर्षांच्या कालावधीनंतर शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुधारणा केली असून, दोन्ही इंधनांच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ केली आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ९४.७७ रुपयांवरून ९७.७७ रुपये झाले आहेत.

Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. इराणने होर्मुझ बंद केला असून आता भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी चार वर्षांनी दरवाढ केली आहे. दोन दिवसापूर्वीच इंधनाची बचत करण्याचा मोदींनी सल्ला दिला होता. दरम्यान, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर काही राज्यांमधील पेट्रोल पंप रविवारी बंद ठेवण्यात आले आहेतअसा दावा सोशल मिडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र, तपासात वेगळेच काही समोर आले आहे.
व्हायरल पोस्टनुसार,"रविवारी इंधन उपलब्ध होणार नाही.आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, पुदुचेरी, महाराष्ट्र आणि हरयाणा या राज्यांमध्ये पेट्रोल पंप प्रत्येक रविवारी बंद राहतील, असा दावा करणारी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये इंडियन पेट्रोल डीलर्स एक्झिक्युटिव्ह कमिटीने निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
पीआयबीने खंडन केले
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटने व्हायरल पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन वाचवण्याच्या आवाहनानंतर रविवारी काही राज्यांमध्ये पेट्रोल पंप बंद राहतील, असा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. हा दावा खोटा आहे." तसेच, केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा, असा सल्लाही देण्यात आला आहे.
पेट्रोल आणि डिझेल किती रुपयांनी महागले?
सरकारी तेल कंपन्यांनी चार वर्षांच्या कालावधीनंतर शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर तीन रुपयांची वाढ केली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९४.७७ रुपयांवरून ९७.७७ रुपयांपर्यंत वाढला आहे. पश्चिम आशियाई संघर्षानंतर जागतिक ऊर्जा किमतींमध्ये झालेल्या वाढीच्या तुलनेत ही वाढ आवश्यक असलेल्या दरवाढीच्या फक्त एक दशांश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खर्च वाढत असूनही सरकारी तेल कंपन्यांनी ११ आठवडे इंधनाचे दर स्थिर ठेवले होते, पण कामकाज तोट्यात गेल्याने त्यांना काही खर्च ग्राहकांवर टाकावा लागला. २८ फेब्रुवारी रोजी पश्चिम आशियातील संकट सुरू झाल्यापासून ब्रँडेड डिझेलच्या दरात झालेली ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी मार्च महिन्यात प्रति लिटर २ रुपयांची दरवाढ झाली होती.
A post is going viral on social media claiming that after PM Narendra Modi’s call to conserve fuel, petrol pumps will remain closed every Sunday in certain states.#PIBFactCheck
❌ This claim is #FAKE
🚫 NEVER share unverified messages. Stay alert and rely only on trusted… pic.twitter.com/TPEmHHSIRP— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 14, 2026