भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 12:07 IST2026-05-15T12:02:13+5:302026-05-15T12:07:36+5:30
Ashok Kharat Rupali Chakankar: खरातच्या नियंत्रणाखाली चालणाऱ्या ‘शिवनिका संस्थान’ या ट्रस्टमधील आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि निधीची चौकशी सुरू आहे.

भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
मुंबई : भोंदू अशोक खरात याच्यासोबत कथितरीत्या आर्थिक व्यवहार केल्याच्या मुद्द्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची गुरुवारी साडेआठ तास चौकशी केली. सकाळी साडेदहा वाजता चाकणकर ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या व सायंकाळी ७ च्या दरम्यान त्या तेथून बाहेर पडल्या.
खरातच्या नियंत्रणाखाली चालणाऱ्या ‘शिवनिका संस्थान’ या ट्रस्टमधील आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि निधीची चौकशी सुरू आहे. रुपाली चाकणकर या ट्रस्टच्या विश्वस्त असल्याने त्यांच्याकडेही चौकशी सुरू आहे.
ईडीच्या तपासात अशोक खरात याने नाशिकमधील २ सहकारी पतसंस्थांमध्ये इतरांच्या नावाने अनेक बँक खाती उघडल्याचे समोर आले. मात्र या खात्यांमध्ये स्वतःचा मोबाइल क्रमांक आणि नॉमिनी म्हणून स्वतःचे नाव वापरून तोच व्यवहार नियंत्रित करत असल्याचा संशय आहे.
या खात्यांमधून खंडणी आणि फसवणुकीतून मिळालेला पैसा फिरवल्याचा ईडीचा दावा आहे. नोटाबंदीदरम्यान ३४ खात्यांमध्ये सुमारे १.८ कोटी रुपये जमा केले होते. नंतर या रकमांच्या मुदतठेवी करून त्या २०२३-२४ दरम्यान मोडल्याची माहिती समोर आली. या पैशातून जमिनी खरेदी केल्याचाही संशय व्यक्त होत आहे.
‘खरातसोबत कोणताही आर्थिक व्यवहार नाही’
ईडीच्या कार्यालयातील चौकशी संपल्यानंतर रुपाली चाकणकर म्हणाल्या की, ईडीच्या अधिकाऱ्यांना मी चौकशीत पूर्णपणे सहकार्य केले आहे. मी जरी साडेआठ तास ईडीच्या कार्यालयात असले तरी प्रत्यक्ष चौकशी चार ते साडेचार तास चालली.त्यांना माझ्या जवाबाचे टायपिंग करायचे होते तसेच मध्ये जेवणाची वेळ होती त्यामुळे इतका वेळ लागला.
माझे खरात सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार झाले नसल्यामुळे फारसे प्रश्नच उद्भवले नाहीत. माझी बहीण प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांच्या नावे समता पतसंस्थेत असलेली खाती बनावट असल्याचे मी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
पतसंस्थेत व अन्य एका पतसंस्थेत अशी जवळपास १२५ बनावट खाती असल्याची माहिती आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेली माझी आजची चौकशी संपलेली आहे. पुन्हा चाैकशीला बोलावले तर निश्चितपणे सहकार्य करेन. गुवाहाटीला खरात कुटुंब जाणार होते. त्यावेळी त्यांच्यावर गुरु म्हणून माझी श्रद्धा होती. गुरुसोबत दर्शन होईल या भावनेने मी कुटुंबासह गुवाहाटी येथे गेल्याचेही त्यांनी सांगितले.