भारतीय संघाचा माजी क्रिकेटर युवराज सिंग यांचे वडील योगराज सिंह यांच्या 'लुख्खे' या नवीन वेब सीरिजवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वेब सीरिजमध्ये योगराज सिंग यांनी महिलांबद्दल अत्यंत अपमानजनक आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणाची योगराज सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पंजाब महिला आयोगाने दखल घेतली आहे. त्यामुळे योगराज सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
'लुख्खे' या बेव सीरिजमधील एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका वकीलाने योगराज सिंग यांच्याविरोधात चंडीगढ येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांनी आपल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, या वेब सीरिजमध्ये स्त्रियांना उद्देशून वापरलेली भाषा इतकी अश्लील आणि अपमानजनक आहे की, तिची पुनरावृत्तीही करता येणार नाही. जर योगराज सिंग स्वतःला आध्यात्मिक गुरु असेही म्हणवून घेतात. पण त्यांनी अशी भाषा स्वतःच्या आई आणि बहिणीच्या समोर वापरली असती तर, कदाचित त्यांनीही लज्जेने मान खाली घातली असते." व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपवर बोलताना वकील म्हणाले की, "महिलांचा अपमान करणाऱ्या भाषेच्या वापरावर कठोर कारवाई करण्यासाठी, त्यांनी केवळ योगराज सिंग यांच्यावरच नव्हे, तर मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यावरही पोलीस कारवाईची मागणी केली."
ही वेबसीरिज पंजाबची अशी बाजू दर्शवते, जिथे रॅप संस्कृती केवळ संगीतापुरती मर्यादित नाही, तर ती ड्रग्ज, गुन्हेगारी, हिंसाचार आणि व्यवस्थेच्या अपयशाशीही जोडलेली आहे. रॅपर-गायक किंग या शोमधून अभिनयात पदार्पण करत आहे. या सीरिजमध्ये राशी खन्ना, पलक तिवारी, लक्षवीर सरन आणि शिवकांत सिंग परिहार यांचाही समावेश आहे. या मालिकेचे दिग्दर्शन हिमांक गौर यांनी केले. ही मालिका ८ मे रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाली. योगराज यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी भाग मिल्खा भाग या चित्रपटातही भूमिका साकारली आहे.