राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 13:45 IST2026-05-15T13:44:58+5:302026-05-15T13:45:46+5:30
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाच्या बातम्या निराधार असल्याचेही केलं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर झाला आहे. परांजपे यांच्या पक्ष प्रवेशानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण करणाऱ्या बातम्या निराधार असल्याचे स्पष्टीकरण शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांनी दिले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री उदय सामंत म्हणाले, "महायुतीत मित्र पक्षांनी युती धर्माचे पालन करावे, असे सामंजस्याने ठरले आहे. मात्र एखादा पदाधिकारी स्वत:हून पक्ष सोडणार असेल तर त्याने महायुतीतच राहावे ही आमची जबाबदारी आहे. परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांना स्वगृही परतण्याचे आवाहन केले होते. मुख्य नेते एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होत परांजपे यांनी तो निर्णय घेतला."
"आनंद परांजपे यांचा डीएनए शिवसेनेचाच असल्याने ते स्वगृही परतले. परांजपे यांनी पक्ष प्रवेशावेळी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. परांजपे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर काही लोक संभ्रम निर्माण करत आहेत, जो निराधार आहे, असे ते म्हणाले. मंत्री उदय सामंत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा मित्र पक्ष आहे. परांजपे यांच्या पक्ष प्रवेशापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे सचिव जय पवार यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना परांजपे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत कल्पना दिली. परस्पर चर्चेनंतरच परांजपे यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला," असे मंत्री सामंत म्हणाले.
आनंद परांजपे यांनीही कुठेही राष्ट्रवादी नेतृत्वावर नाराजी किंवा टीका केलेली नाही. त्यामुळे परांजपे यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न निराधार असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
इंधन बचतीसाठी ईव्हीचा वापर वाढवला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्व मंत्र्यांना काटकसरीचे आदेश दिले होते. उद्योग विभागानेही ईव्ही वाहनांचा वापर वाढवला असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.