शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 16:32 IST2026-05-15T16:27:09+5:302026-05-15T16:32:52+5:30
Adhik Maas Shani Nakshatra Gochar 2026: शनिवारी शनि जयंतीपासूनच हे उपाय करावेत. साडेसातीचा प्रतिकूल प्रभाव कमी होईल. शनि भरभरून देईल, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या...

शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
Adhik Maas Shani Nakshatra Gochar 2026: मे महिन्याचा उत्तरार्ध अनेकार्थाने अतिशय अद्भूत, दुर्मिळ योग आणि महासंयोगांचा ठरत आहे. शनिवार, १६ मे २०२६ रोजी शनि जयंती आहे. तर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ मे २०२६ रोजी मराठी वर्षातील महत्त्वाचा मानला गेलेला काळ अधिक मास सुरू होत आहे. शनि जयंती आणि अधिक मासाच्या शुभ संयोगात शनि ग्रह नक्षत्र गोचर करत आहे. शनिचे नक्षत्र गोचर आणि अधिक मास हा विलक्षण योग असून, साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असणाऱ्या राशींसाठी ही सुवर्ण संधी ठरू शकते. या ५ राशीच्या मंडळींनी कोणते ५ उपाय अवश्य करावे? जाणून घेऊया...
मराठी पंचांगानुसार दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते. अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो. फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत अधिक मास पाळला जातो. अधिक मासाची देवता श्रीविष्णू आहेत. यंदा ज्येष्ठ महिना अधिक मास आला आहे. रविवार, १७ मे २०२६ रोजी अधिक ज्येष्ठ सुरू होत आहे.
शनिचा दुर्लभ त्रिवेणी महासंयोग
नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि ग्रह नक्षत्र परिवर्तन करत आहे. शनिवारी शनि जयंती होत असताना, १७ मे २०२६ रोजी शनि रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ऑक्टोबर २०२६ पर्यंत शनिचे हे गोचर असणार आहे. शनि हा शेवटचा ग्रह मानला गेला असून, शेवटच्या रेवती नक्षत्रात शनि प्रवेश करणार आहे. आताच्या घडीला शनि शेवटच्या म्हणजेच मीन राशीत विराजमान आहे. याच दिवशी अधिक मास सुरू होत आहे. शेवटचा ग्रह, शेवटच्या नक्षत्रात गोचर आणि शेवटच्या राशीत विराजमान असणे हा त्रिवेणी योग अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे शनि जयंतीपासून कमीत कमी अधिक मास आणि शक्य झाले, तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत साडेसाती, ढिय्या/अडीचकी प्रभाव असणाऱ्यांनी शनि उपासना, शनि उपाय अवश्य करावेत, असे म्हटले जाते.
कोणत्या ५ राशींवर साडेसाती आणि ढिय्या प्रभाव सुरू?
शनि हा माणसाचे मन स्वच्छ व शुद्ध करणारा, मनातील घाण व कुविचार टाकून उच्चप्रतिला नेणारा हा एकच ग्रह आहे. शिस्तीचा पाईक आहे. जीवनाचे मर्म जाणणारा व कटू सत्य उगड करुन सांगणारा आहे. जे याची अवज्ञा करतात त्यांना तो खाली ओढतो व माणसाच्या अहंकाराचा नाश करतो. जे शिस्तबद्ध, विनयशील, नम्र आहेत, त्यांना उच्च शिखरावर नेऊन बसवतो, अशी शनिची ख्याती आहे. शनि साडेसाती सर्वांनाच परिचित आहे. साडेसाती योग हा शनिचा विशेष अधिकार मानला जातो. शनि मीन राशीत विराजमान असून, जून २०२७ पर्यंत शनि याच राशीत असणार आहे. कुंभ, मीन आणि मेष या तीन राशींची साडेसाती सुरू आहे. तसेच सिंह आणि धनु या राशींवर शनि ढिय्या सुरू आहे. साडेसाती, ढिय्या प्रभावासह शनि महादशा सुरू असणाऱ्यांनीही हे उपाय करून पाहायला हरकत नाही.
शनि जयंती, अधिक मासात किमान ५ उपाय अवश्य करा
- शनि जयंती शनिवारी येणे अतिशय शुभ मानले गेले आहे.
- शनि मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. शनि महाराजांना काळे तीळ, तेल अर्पण करावेत.
- पिंपळाच्या झाडाशी जल अर्पण करून दिवा दाखवावा.
- शनि संबंधित वस्तू काळे वस्त्र, काळे तीळ, मोहरीचे तेल यांचे दान करावे.
- शनि मंत्राचा जप करावा. शनैश्चर स्तोत्र, शनि चालीसा यांचे पठण करावे.
- मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.
- साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते.
- स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे.
- शनी बीज मंत्राचा जप दररोज करावा. विशेषत: शनिवारी अवश्य करावा.
- हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे.
- हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.
- ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनि धामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.