इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 16:08 IST2026-05-15T16:05:00+5:302026-05-15T16:08:17+5:30
इन्स्टाग्रामचे नवीन 'Instants' फीचर तुम्हाला आवडले नसेल किंवा तुमचे फोटो चुकून शेअर होत असतील, तर ते इनबॉक्समधून कसे हटवायचे याची सोपी पद्धत जाणून घ्या.

इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवनवीन फीचर्स लाँच करत असते. याच अंतर्गत कंपनीने नुकतेच 'इन्स्टंट्स' नावाचे एक नवीन फीचर सादर केले आहे. स्नॅपचॅटला टक्कर देण्यासाठी कंपनीने हे गायब होणारे फोटो शेअरिंग फीचर आणले आहे. मात्र, सध्या हे फीचर युजर्ससाठी फायद्याचे ठरण्याऐवजी मोठी डोकेदुखी बनले आहे. या फीचरमुळे युजर्सचे खाजगी फोटो चुकून इतरांना पाठवले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जर तुम्हालाही हे फीचर आवडले नसेल, तर ते सहज बंद कसे करायचे, याची सोपी पद्धत आपण जाणून घेणार आहोत.
नेमकी काय आहे युजर्सची तक्रार?
इन्स्टाग्रामने हे फीचर इनबॉक्समध्ये एका मिनी फोटो स्टॅकसारखे दिले आहे. यामध्ये फोटो पाठवण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि अस्पष्ट आहे. शटर बटण दाबताच फोटो थेट मित्रांना सेंड होतो. तो 'क्लोज फ्रेंड्स'सोबत शेअर करायचा असेल तर दरवेळी मॅन्युअली सेट करावे लागते. यामुळे अनेकदा युजर्सचे वैयक्तिक फोटो अनपेक्षितपणे फ्रेंड लिस्ट मधील अशा लोकांकडे जात आहेत, ज्यांना ते पाठवायचे नव्हते. यामध्ये 'अन्डू'चा पर्याय असला तरी, समोरच्या व्यक्तीने फोटो पाहण्यापूर्वीच तो वापरावा लागतो. फोटो कधी सेंड झाला, हेच समजत नसल्याने युजर्स त्रस्त झाले असून हे फीचर बंद करण्याची मागणी करत आहेत.
Instagram 'Instants' फीचर असे करा बंद :
जर तुम्हाला इन्स्टाग्राम इनबॉक्समधील हे फीचर हटवायचे असेल, तर खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
१. सर्वात आधी तुमचे Instagram App ओपन करा आणि तुमच्या Profile वर जा.
२. स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या थ्री-लाईन मेनूवर टॅप करून 'Settings' मध्ये जा.
३. आता खाली स्क्रोल करा आणि 'Content Preferences' या सेक्शनवर क्लिक करा.
४. येथे तुम्हाला "Hide Instants in Inbox" हा पर्याय दिसेल.
५. या पर्यायासमोरील टॉगल ऑन करा.
हा पर्याय सुरू करताच तुमच्या इनबॉक्समधून 'Instants' गायब होईल. मात्र, हे फीचर बंद केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मित्रांनी पाठवलेले 'Instants' फोटो देखील दिसणार नाहीत, हे लक्षात ठेवा.