India-UAE: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरात भीषण ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. या संकटाचा भारतावरील परिणाम कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी आपल्या संयुक्त अरब अमिराती(UAE) दौऱ्यात LPG पुरवठा आणि धोरणात्मक तेल साठे संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच हे करार करण्यात आले आहेत, ज्यामुळे या घडामोडीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
मोदींचा २ तासांचा धावता दौरा अन् मोठे करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-नॉर्डिक शिखर परिषदेसाठी (India–Nordic Summit) जात असताना त्यांनी अबुधाबी येथे अवघ्या दोन तासांचा 'स्टॉपओव्हर' (थोड्या वेळासाठी मुक्काम) घेतला. या अत्यंत महत्त्वाच्या दौऱ्यात त्यांनी युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेतली खालील महत्त्वपूर्ण करारांवर शिक्कामोर्तब केले.
UAE: In the presence of Prime Minister Narendra Modi and UAE President Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan, several agreements and MoUs were exchanged between India and the UAE, including the Framework Agreement for a Strategic Defence Partnership, an MoU on Strategic Petroleum… pic.twitter.com/v4zHCcbtu6
— IANS (@ians_india) May 15, 2026
एलपीजी पुरवठा करार: भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी आयातदार देश आहे. युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली तरी देशात घरगुती गॅसचा तुटवडा भासू नये, यासाठी हा करार मैलाचा दगड ठरेल.
राखीव तेल साठा: आणीबाणीच्या काळात देशांतर्गत इंधनाची गरज भागवण्यासाठी राखीव तेल साठ्याबाबत दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाला.
संरक्षण आणि जहाज दुरुस्ती: दोन्ही देशांनी धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या फ्रेमवर्कवर स्वाक्षरी केली. तसेच गुजरातमधील 'वादिणार' येथे जहाज दुरुस्ती क्लस्टर स्थापन करण्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला.
पंतप्रधानांच्या दौऱ्याचे टायमिंग महत्त्वाचे का?
पंतप्रधानांचा हा युएई दौरा अशा वेळी झाला आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच त्यांनी देशवासियांना इंधन बचतीचे जाहीर आवाहन केले होते. पश्चिम आशियातील युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नागरिकांना 'वर्क फ्रॉम होम'चा वापर वाढवण्याचे, ऑफिसला जाताना सार्वजनिक वाहतूक किंवा कारपूलचा वापर करण्याचे आवाहन केले होते. याला त्यांनी 'देशभक्तीचे कर्तव्य' असे म्हटले होते. याशिवाय, देशावरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी पुढील एक वर्ष सोनं खरेदी करणे आणि परदेशी सहलींवर जाणे टाळावे, असे थेट आवाहनही त्यांनी केले होते.
देशात पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी महागले
दरम्यान, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर, आज (१५ मे) सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ केली. या निर्णयामुळे सरकारवर चौफेर टीका होत आहे. मात्र, आता भारताने युएईसोबत करार केल्यामुळे काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
