हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 15:13 IST2026-05-15T15:12:04+5:302026-05-15T15:13:11+5:30
इराणसाठी हेरगिरी करणाऱ्या माजी अमेरिकन हवाई दलाच्या अधिकारी मोनिका विटचा शोध घेण्यात एफबीआय अपयशी ठरली आहे.

हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
जगातील सर्वात बलाढ्य गुप्तहेर संघटना मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या 'एफबीआय'ला एका महिला गुप्तहेराने मोठा चकवा दिला आहे. अमेरिकेच्या हवाई दलात महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेली आणि नंतर इराणसाठी हेरगिरी करणारी महिला अधिकारी मोनिका विट हिला शोधण्यात अमेरिकन यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. अखेर हताश झालेल्या एफबीआयने आता जनतेची मदत मागितली असून, मोनिकाचा सुगावा लावणाऱ्याला चक्क २,००,००० डॉलर्स (सुमारे १ कोटी ७० लाख रुपयांपेक्षा जास्त)चे बक्षीस जाहीर केले आहे.
कोण आहे ही 'लेडी व्हिलन' मोनिका विट?
मोनिका विट ही आधी अमेरिकन हवाई दलाच्या 'ऑफिस ऑफ स्पेशल इन्व्हेस्टिगेशन'मध्ये काउंटर इंटेलिजन्स अधिकारी म्हणून कार्यरत होती. २००३ ते २००८ या काळात तिच्याकडे मध्य पूर्व आशियाशी संबंधित अनेक अत्यंत संवेदनशील आणि गुप्त मिशनची जबाबदारी होती. मात्र, नोकरी सोडल्यानंतर तिने आपल्याच देशाशी गद्दारी केली आणि ती थेट अमेरिकेचा कट्टर शत्रू मानल्या जाणाऱ्या इराणच्या गोटात सामील झाली.
२०१३ मध्ये झाली फरार, अमेरिकेची गुपिते केली उघडी
तपास यंत्रणांच्या मते, मोनिका २०१३ मध्येच अमेरिकेतून पळून इराणमध्ये आश्रयाला गेली होती. २०१२ ते २०१५ या काळात तिने इराणच्या गुप्तहेर संघटनांसोबत मिळून अमेरिकेचे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय संरक्षण दस्तऐवज आणि गुप्त माहिती इराणला पुरवली. या माहितीचा वापर इराणने अमेरिकेविरुद्ध सायबर हल्ले आणि इतर कारवायांसाठी केला. २०१९ मध्ये अमेरिकेने तिच्यावर अधिकृतपणे जासूसी आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
इराणकडून मिळाले आलिशान घर आणि संगणक!
अमेरिकेविरुद्ध बंड पुकारल्यानंतर इराण सरकारने मोनिका विटचे जंगी स्वागत केले होते. इराणमध्ये राहून तिने अमेरिकेविरुद्ध कारवाया सुरू ठेवाव्यात, यासाठी इराणी अधिकाऱ्यांनी तिला आलिशान घर, अत्याधुनिक कॉम्प्युटर सिस्टीम आणि सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या होत्या. या कटकारस्थानात मोनिकाला मदत करणाऱ्या चार इराणी नागरिकांवरही अमेरिकेने गुन्हे दाखल केले आहेत.
"आम्ही विसरलेलो नाही!"
सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या प्रचंड तणावाच्या पार्श्वभूमीवर एफबीआयच्या वॉशिंग्टन फील्ड ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी थेट आवाहन केले आहे. "आम्ही मोनिका विटला विसरलेलो नाही. इराणच्या इतिहासातील या महत्त्वाच्या वळणावर कोणाला ना कोणाला तरी तिच्या ठाण्याची नक्कीच माहिती असेल. आम्ही जनतेला आवाहन करतो की, तिची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून तिला न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभे करता येईल," असे एफबीआयने म्हटले आहे.