उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 15:17 IST2026-05-15T15:15:28+5:302026-05-15T15:17:36+5:30
Electricity Crisis: वाढत्या उकाड्यामुळे विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपन्यांसमोर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.

उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
मुंबई: वाढत्या उकाड्यामुळे विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपन्यांसमोर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. काही भागांत तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा विस्कळीत होत असून, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करत पुरवठा पूर्ववत केला जात आहे. विशेषतः बेस्टच्या ग्राहकांना या अडचणीला सामोरे जावे लागत असून, तक्रार करूनही पाऊण तासाने वीजपुरवठा सुरळीत होत असल्याची तक्रार ग्राहक करीत आहेत.
गुरुवारी दुपारी ३३ केव्ही फीडरमध्ये बिघाड झाल्याने शीतला देवी रीसीव्हिंग स्टेशनच्या ट्रान्सफॉर्मर क्रमांक २ वर परिणाम झाला आणि काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. येथील वीज पूर्ववत करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, विलंब होत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.
सध्याचा लोड गंभीर; वीजबचतीची गरज
विजेची मोठी मागणी आणि पुरवठ्यामुळे सध्याची लोड परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत वाढत्या तापमानामुळे येत्या काही दिवसांत वीज मागणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, नागरिकांनीही वीजबचतीकडे लक्ष देण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले.
...तर अतिरिक्त विजेची खरेदी
गुरुवारी अदानी इलेक्ट्रिसिटी कडून २२९७मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यात आला. उन्हाळ्यातील विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी दीर्घकालीन, मध्यमकालीन आणि अल्पकालीन ऊर्जा स्रोतांची व्यवस्था केल्याचे अदानी इलेक्ट्रिसिटीकडून सांगण्यात आले. यामध्ये द्विपक्षीय हंगामी करार, अतिरिक्त नवीकरणीय ऊर्जा करारांचाही समावेश आहे. मागणीत आणखी वाढ झाल्यास, अल्पकालीन वीज बाजारातून अतिरिक्त वीज खरेदी केली जाणार आहे.
१) एकूण विजेची मागणी: १३ मे रोजी मुंबईची वीज मागणी ४,४२४ मेगावॅट होती. त्यापैकी टाटा पॉवरच्या क्षेत्रातील मागणी १,३०५ मेगावॅट होती. यापूर्वी ११ मे रोजी मुंबईची पीक डिमांड ४,५७९ मेगावॅटपर्यंत पोहोचली होती, तर टाटाच्या क्षेत्रातील मागणी १,३१६ मेगावॅट होती. १२ मे रोजी ही मागणी अनुक्रमे ४,३९७मेगावॅट आणि १,२१५ मेगावॅट इतकी नोंदवली गेली.
२)'डिमांड फोरकास्टिंग'चा वापर: कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग आधारित डिमांड फोरकास्टिंग मॉडेल्सचा वापर करण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे वीज वापर, हवामान अंदाज आणि रिअल टाइम ग्रीड स्थितीचे विश्लेषण करून दिवसातील विविध वेळांतील वीज मागणीचा अंदाज घेतला जातो. त्यामुळे वीज खरेदी कार्यक्षम पद्धतीने होत असून, तुटवडा टाळता येत आहे.
२ अंशाने तापमान वाढताच १०० ते २००
मेगावॅटने वाढते मागणी: उकाड्यामुळे एसी, पंखे व कूलर यांसारखी उपकरणे सातत्याने सुरू ठेवावी लागत असल्याने विजेचा वापर वाढत आहे. वीज तज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तापमानात प्रत्येक दोन अंशांनी वाढ झाली की विजेची मागणी सुमारे २०० मेगावॅटने वाढते.