Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, मिळणार सरकारची गॅरेंटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 09:59 IST2026-01-20T09:42:01+5:302026-01-20T09:59:18+5:30

Post Office Saving Schemes: आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये २ लाख रुपये जमा करून ८९,९९० रुपयांचे फिक्स व्याज मिळवता येऊ शकतं.

Post Office Saving Schemes: बचत खात्यांवर जास्त परतावा देण्याच्या बाबतीत पोस्ट ऑफिसनं देशातील दिग्गज बँकांना मागे टाकलं आहे. वास्तविक, भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्यानंतर सर्व बँकांनी एफडी (FD) योजनेचे व्याजदरही कमी केले होते. मात्र, पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेवर अजूनही पूर्वीप्रमाणेच बंपर व्याज मिळत आहे.

विशेष म्हणजे, पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये दर ३ महिन्यांनी गरजेनुसार सुधारणा केली जाते आणि याचे नियंत्रण स्वतः वित्त मंत्रालय करते. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये २ लाख रुपये जमा करून ८९,९९० रुपयांचे फिक्स व्याज मिळवता येऊ शकतं.

पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षे कालावधीसाठी एफडी खातं उघडता येतं. पोस्ट ऑफिसमध्ये एफडी खाती 'टीडी' (Time Deposit - टाइम डिपॉझिट) या नावानं उघडली जातात. पोस्ट ऑफिसचे टीडी खाते अगदी बँकांच्या एफडी खात्यासारखेच असते, ज्यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीवर निश्चित व्याजासह संपूर्ण पैसे परत मिळतात.

पोस्ट ऑफिसच्या टीडी योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यावर थेट केंद्र सरकारचे नियंत्रण असतं, त्यामुळे तुम्हाला केवळ सरकारी गॅरंटीसह फिक्स व्याज मिळत नाही तर तुमचे पैसेही पूर्णपणे सुरक्षित राहतात. पोस्ट ऑफिस १ वर्षाच्या टीडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या टीडीवर ७.० टक्के, ३ वर्षांच्या टीडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या टीडीवर ७.५ टक्के व्याज देत आहे.

जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये ५ वर्षांच्या टीडी योजनेत २,००,००० रुपये जमा केले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण २,८९,९९० रुपये मिळतील, ज्यामध्ये ८९,९९० रुपयांच्या फिक्स व्याजाचा समावेश आहे.

सध्याच्या काळात देशातील कोणतीही बँक ५ वर्षांच्या एफडी योजनेवर ७.५ टक्के व्याज देत नाही. मात्र, तुम्हाला एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागेल की, पोस्ट ऑफिसच्या टीडी योजनेत सर्व वयोगटातील ग्राहकांना समान व्याज मिळते. याउलट, बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत ०.५० टक्के जास्त व्याज मिळते. अनेक बँका ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांना आणखी जास्त व्याज ऑफर करतात.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)