Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 10:47 IST2026-01-26T10:39:08+5:302026-01-26T10:47:21+5:30
Post Office Investment Scheme: सध्या अनेक जण गुंतवणूकीबाबत सतर्क झाले आहेत. भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची असते. सर्वांनाच आपले पैसे सुरक्षित राहावं असं वाटत असतं.

Post Office Investment Scheme: सध्या अनेक जण गुंतवणूकीबाबत सतर्क झाले आहेत. भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची असते. सर्वांनाच आपले पैसे सुरक्षित राहावं असं वाटत असतं. सरकार पोस्टाच्या माध्यमातून अनेक योजना चालवत असते. यात तुमचे पैसेही सुरक्षित असतात.

भारतीय पोस्ट ऑफिस सामान्य लोकांसाठी अनेक लहान बचत योजना ऑफर करतं. त्यापैकीच एक खास बचत योजना म्हणजे रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना. भारत सरकारद्वारे समर्थित ही पोस्ट ऑफिस आरडी योजना बचतीचा एक शिस्तबद्ध आणि सुरक्षित पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला गॅरंटीड रिटर्न मिळतो. या योजनेत तुम्ही छोटी रक्कम गुंतवून एका ठराविक कालावधीत मोठा फंड तयार करू शकता.

पोस्ट ऑफिसची आरडी योजना ही एक मासिक गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम ५ वर्षांसाठी (६० महिने) जमा करता. या जमा रकमेवर त्रैमासिक चक्रवाढ व्याज मिळते, ज्यामुळे कमी जोखीम आणि स्थिर परतावा इच्छिणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो.

ही योजना मार्केट-लिंक्ड नसल्यामुळे शेअर बाजारातील चढ-उतारांचा यावर कोणताही परिणाम होत नाही. मात्र, अनिवासी भारतीय (NRI) सध्या हे खातं उघडू शकत नाहीत, ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे.

पोस्ट ऑफिस आरडी योजनेत सध्या ६.७% वार्षिक व्याज दिलं जात असून त्याची गणना त्रैमासिक चक्रवाढ पद्धतीनं केली जाते. या योजनेचा कालावधी ५ वर्षे असून तुम्ही दरमहा किमान १०० रुपये गुंतवून सुरुवात करू शकता, तर कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही.

गुंतवणूकदार रोख, चेक किंवा ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करू शकतात आणि हवं असल्यास ५ वर्षांचे हप्ते एकाच वेळी भरण्याची सोयही उपलब्ध आहे. तसंच बचत खातं लिंक करून मासिक हप्ता आपोआप कापला जाण्याची सुविधाही घेता येते.

या योजनेअंतर्गत कोणतीही प्रौढ व्यक्ती खातं उघडू शकते. याशिवाय १० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे अल्पवयीन मुल स्वतःच्या नावानं खातं उघडू शकते. तसेच दोन किंवा अधिक व्यक्ती मिळून संयुक्त खातं देखील उघडू शकतात.

पोस्ट ऑफिस आरडीवरील व्याज दर तीन महिन्यांनी मुद्दलात जोडलं जातं, ज्यामुळे व्याजावरही व्याज मिळते. जर तुम्ही दरमहा २००० रुपये ५ वर्षांसाठी जमा केले, तर कैलकुलेटरनुसार तुम्हाला व्याजापोटी २२,७३२ रुपये मिळतील. अशा प्रकारे ६० महिन्यांत तुमची एकूण गुंतवणूक १,२०,००० रुपये होईल आणि मुदत संपल्यानंतर तुमच्या हातात एकूण १,४२,७३२ रुपयांचा फंड असेल.

















