शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 16:34 IST

1 / 15
Adhik Maas 2026: सन २०२६ या वर्षाचा मे महिना अतिशय वैविध्यपूर्ण आहे. याच महिन्यात १७ मे २०२६ पासून अधिक मास सुरू होत आहे. सुमारे तीन वर्षांनी अधिक मास येतो. त्यामुळेच याचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण असेच मानले गेले आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात.
2 / 15
Adhik Maas 2026 Vrat List: मराठी पंचांगानुसार दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो व ते वर्ष तेरा महिन्यांचे असते. अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. अधिक मास फक्त महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत पाळला जातो, असे म्हणतात. चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो.
3 / 15
Adhik Maas 2026 Festivals: अधिक मासात दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिकमास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. यंदा ज्येष्ठ महिना अधिक मास आला आहे. रविवार, १७ मे २०२६ रोजी अधिक ज्येष्ठ सुरू होत आहे. सोमवार, १५ जून २०२६ पर्यंत अधिक ज्येष्ठ असणार आहे. तर, सोमवार, १५ जून २०२६ याच दिवशी निज ज्येष्ठ सुरू होत आहे. मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी निज ज्येष्ठ मास संपणार आहे.
4 / 15
Adhik Mahina 2026 Vrat Festival Dates: सन २०२६ च्या अधिक आणि निज ज्येष्ठ मासात ४ चतुर्थी येणार आहेत. तर चार एकादशी व्रते आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अधिक आणि निज या दोन्ही ज्येष्ठ महिन्यात गुरुपुष्यामृत योग जुळून येणार आहे. दोन्ही वेळेस गुरुपुष्यामृत योग दिवसभर असल्याने असा योगायोग अतिशय शुभ आणि पुण्य फलदायी मानला गेला आहे. ज्येष्ठ अधिक मास आणि निज ज्येष्ठ महिन्यातील व्रते, सण-उत्सव जाणून घेऊया...
5 / 15
Adhik Maas 2026 Vinayaka Chaturthi Angarak Yoga: रविवार १७ मे २०२६ रोजी अधिक मास सुरू होताच ज्येष्ठ अधिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून येत आहे. १९ मे २०२६ रोजी अंगारकी विनायक चतुर्थी आहे. या दिवशी गणपती बाप्पाचे विशेष पूजन, नामस्मरण, जप इत्यादी अतिशय शुभ तसेच पुण्य फलदायी मानले गेले आहे.
6 / 15
Adhik Maas 2026 Gurupushyamrut Yoga: विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आल्यानंतर लगेचच गुरुवारी गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे. गुरुवार, २१ मे २०२६ रोजी सकाळी ०६ वाजून ०५ मिनिटांपासून ते उत्तररात्रौ ०२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृत योग असणार आहे.
7 / 15
Adhik Maas 2026 Durga Ashtami Vrat: यानंतर शनिवार, २३ मे २०२६ रोजी अधिक मास ज्येष्ठ महिन्यातील दुर्गाष्टमी आहे. अधिक मासाच्या पहिल्याच दिवशी सुरू झालेला गंगादशहरा सोमवार २५ मे २०२६ रोजी समाप्त होणार आहे. या दिवशी गंगावतार आहे.
8 / 15
Adhik Maas 2026 Ekadashi Vrat: अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो. या महिन्याचे स्वामित्व श्रीविष्णूंकडे असते. त्यामुळे अधिक महिन्यात येणाऱ्या एकदाशी विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. अधिक मास ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्ष एकादशी बुधवार, २७ मे २०२६ रोजी असणार आहे. अधिक मासातील एकादशी कमला एकादशी नावाने ओळखली जाते.
9 / 15
Adhik Maas 2026 Pradosh Vrat Purnima: अधिक मासातील प्रदोष व्रत गुरुवार, २८ मे २०२६ रोजी आहे. हे व्रत गुरु प्रदोष या नावानेही ओळखले जाते. अधिक ज्येष्ठ मासातील पौर्णिमा शनिवार, ३० मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होत आहे. रविवार, ३१ मे २०२६ रोजी दुपारी ०२ वाजून १४ मिनिटांनी अधिक मासाची पौर्णिमा समाप्त होणार आहे. यानंतर अधिक मासाचा वद्य पक्ष सुरू होईल.
10 / 15
Adhik Maas 2026 Sankashti Chaturthi: अधिक मासातील संकष्ट चतुर्थी बुधवार, ०३ जून २०२६ रोजी आहे. अधिक मासातील संकष्टी चतुर्थीचे महत्त्व अनन्य साधारण असून, या दिवशी विशेष गणपती पूजन, नामस्मरण जप करणे शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे. यानंतर रविवार, ०७ जून रोजी भानुसप्तमी आहे. तर, सोमवार, ०८ जून २०२६ रोजी अधिक मासाची कालाष्टमी आहे.
11 / 15
Adhik Maas 2026 Ekadashi Vrat: अधिक मासाच्या वद्य पक्षातील एकादशी गुरुवार, ११ जून २०२६ रोजी असून, ही एकादशी कमला एकादशी नावाने ओळखली जाते. अधिक मासातील दोन्ही एकादशींची नावे समानच आहेत. तर शुक्रवार, १२ जून २०२६ रोजी शुक्र प्रदोष व्रत आहे. शनिवार, १३ जून २०२६ रोजी अधिक महिन्यातील मासिक शिवरात्रि आहे.
12 / 15
Adhik Maas 2026 Somvati Amavasya: अधिक मासाची अमावास्या रविवार, १४ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी सुरू होत असून, सोमवार सकाळी ०८ वाजून २४ मिनिटांनी अधिक मासाची अमावास्या समाप्त होणार आहे. ही अमावास्या सोमवती अमावास्या असणार आहे. यानंतर निज ज्येष्ठ मासारंभ होणार आहे. निज ज्येष्ठ मासातील विनायक चतुर्थी गुरुवार, १८ जून २०२६ रोजी असणार आहे.
13 / 15
Jyeshtha Maas 2026 Vinayaka Chaturthi: निज ज्येष्ठ मासातील विनायक चतुर्थी गुरुवार, १८ जून २०२६ रोजी असणार आहे. विशेष म्हणजे निज ज्येष्ठ मासाच्या विनायक चतुर्थी या दिवशीच गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे. निज ज्येष्ठ मासातील गुरुपुष्यामृत योग गुरुवार, १८ जून २०२६ रोजी पहाटे ०६ वाजून ०४ मिनिटांपासून ते सकाळी ११ वाजून ३२ मिनिटांपर्यंत असणार आहे. सोमवार, २२ जून २०२६ रोजी निज ज्येष्ठ मासाची दुर्गाष्टमी आहे.
14 / 15
Jyeshtha Maas 2026 Ekadashi Vrat Vat Purnima Vrat: निज ज्येष्ठ मासाच्या शुद्ध पक्षातील एकादशी गुरुवार, २५ जून २०२६ रोजी असून, ही एकादशी निर्जला एकादशी नावाने ओळखली जाते. यानंतर शनिवार, २७ जून २०२६ रोजी शनि प्रदोष व्रत आहे. याच दिवशी वटसावित्री व्रतारंभ आहे. रविवार २८ जून २०२६ रोजी मध्यरात्री ०३ वाजून ०६ मिनिटांनी निज ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होत आहे. निज ज्येष्ठ मासातील पौर्णिमेला सोमवार, २९ जून २०२६ रोजी वटपौर्णिमा आहे. मंगळवार, ३० जून २०२६ रोजी पहाटे ०५ वाजून २६ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होत आहे.
15 / 15
Jyeshtha Maas 2026 Sankashti Chaturthi Ekadashi Pradosh Shivratri Vrat: निज ज्येष्ठ मासाची संकष्ट चतुर्थी शुक्रवार, ०३ जुलै २०२६ रोजी आहे. तर, मंगळवार ०७ जुलै २०२६ रोजी कालाष्टमी आहे. शुक्रवार, १० जुलै रोजी निज ज्येष्ठ मासाच्या वद्य पक्षातील योगिनी स्मार्त एकादशी आहे. तर, ११ जुलै २०२६ रोजी भागवत एकादशी आहे. निज ज्येष्ठ मासात रविवार, १२ जुलै २०२६ रोजी रवि प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी आहे. सोमवार, १३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ०६ वाजून ५० मिनिटांनी निज ज्येष्ठ अमावास्या प्रारंभ होत असून, १४ जुलै २०२६ रोजी दुपारी ०३ वाजून १३ मिनिटांनी निज ज्येष्ठ मास अमावास्या समाप्त होत आहे. यानंतर निज ज्येष्ठ मासाची सांगता होईल.
टॅग्स :Adhik Maasअधिक महिनाIndian Festivalsभारतीय उत्सव-सणvinayak chaturthiविनायक चतुर्थीekadashiएकादशीPradosh Vratप्रदोष व्रतSankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीLord ShivaमहादेवLord Krishnaभगवान श्रीकृष्णspiritualअध्यात्मिकcultureसांस्कृतिकganpatiगणपती 2025