अमृतसर/जालंधर: पंजाबमध्ये गेल्या २४ तासांत दोन पाठोपाठ झालेल्या स्फोटांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. जालंधरमधील सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) मुख्यालयानंतर, मंगळवारी उशिरा रात्री अमृतसरमधील खासा येथील लष्करी तळाजवळ (Army Camp) भीषण स्फोट झाला. या घटनांनंतर संपूर्ण राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणांनी तपास तीव्र केला आहे.
अमृतसर ग्रामीणचे एसपी आदित्य एस. वारियर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासा कॅन्टोन्मेंट परिसराजवळ रात्री १०:५० च्या सुमारास जोरदार स्फोटाचा आवाज आला. हा परिसर अटारी-वाघा सीमेपासून अवघ्या १५ किमी अंतरावर आहे. प्राथमिक संशयानुसार, मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने ग्रेनेड फेकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लष्करी अधिकारी आणि पोलिसांनी तातडीने परिसराला वेढा घातला असून 'बॉम्ब शोधक व नाशक पथका'कडून तपास सुरू आहे.
जालंधर: BSF मुख्यालयाजवळ स्कूटरचा स्फोटया घटनेच्या काही तास आधी जालंधरमधील गजबजलेल्या 'बीएसएफ चौक' परिसरात एका उभ्या असलेल्या स्कूटरचा भीषण स्फोट झाला. ही घटना पंजाब फ्रंटियर मुख्यालयाच्या अगदी बाहेर घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटानंतर आगीचे गोळे आणि धूर हवेत उडताना दिसत आहेत. याप्रकरणी २२ वर्षीय डिलिव्हरी बॉय गुरप्रीत सिंग याची चौकशी सुरू आहे.
राजकारण तापले: विरोधकांचा 'आप' सरकारवर हल्लाया घटनांनंतर पंजाबमधील कायदा व सुव्यवस्थेवरून राजकारण तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजीठिया यांनी आम आदमी पार्टी सरकारवर कडक टीका केली आहे. "इतक्या संवेदनशील भागात स्फोट होणे हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे," असा आरोप मजीठिया यांनी केला आहे.