एक लोकप्रिय चित्रपट अभिनेता दोन वर्षांपूर्वी राजकीय पक्ष स्थापन करतो. स्वाभाविकपणे त्या पक्षाकडे प्रस्थापित पक्षांसारखी संघटनात्मक बांधणी नसते. त्या अभिनेत्याचे राज्यभर पसरलेले फॅन क्लबच संघटनेची जागा घेतात. तो नवा पक्ष तात्पुरत्या चिन्हावर निवडणूक लढतो आणि वर्षानुवर्षांपासून पाय रोवून बसलेल्या प्रस्थापित पक्ष, आघाड्यांना चारीमुंड्या चीत करत, थेट बहुमतापर्यंत पोहोचूनच थांबतो ! ही एखाद्या चित्रपटाची कथावस्तू वाटते; पण चित्रपटवेड्या तामिळनाडूत ते प्रत्यक्षात घडले आहे. सुपरस्टार विजय जोसेफ यांचा ‘तमिळग वेट्री कळगम’ (टीव्हीके) पक्ष विधानसभेच्या २३४ पैकी १०८ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. एम. जी. रामचंद्रन, जयललिता, करुणानिधी अशा चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना मुख्यमंत्री करण्याची परंपरा असलेल्या तामिळनाडूने पुन्हा एकदा सिद्ध केले की, तिथे रूपेरी पडद्यावरील नायक प्रत्यक्ष जीवनातही नायकच असतो. पण विजय यांचे यश केवळ ‘ग्लॅमर’मुळे नव्हे, तर त्यापलीकडे जात, मोठ्या सामाजिक-राजकीय प्रवाहांवर स्वार होऊन आले आहे.
स्वबळावर निवडणूक लढवण्याचे धाडस ‘थलपती विजय’ यांनी केले आणि द्रविड मुन्नेत्र कळगम व अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगमसारख्या प्रस्थापित पक्षांना अक्षरश: लोळवले ! तामिळनाडूचे राजकारण १९७२ पासून द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्यातच फिरत राहिले. दोन्ही पक्षांवर भ्रष्टाचार, घराणेशाही आणि सत्तेच्या केंद्रीकरणाचे आरोप सातत्याने झाले. एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकारने २०२१ मध्ये मोठ्या बहुमताने सत्ता मिळवली होती; पण पाच वर्षांत अपेक्षा आणि कामगिरी यांच्यातील दरी रुंदावली. ‘प्रस्थापितविरोधी लाट’ हा शब्द राजकारणात नेहमी वापरला जातो; पण तामिळनाडूत तो यावेळी खऱ्या अर्थाने प्रकट झाला. विजय यांच्या विजयाचे श्रेय केवळ तामिळ जनतेच्या चित्रपटप्रेमाला देणे अर्धसत्य ठरेल. रजनीकांत, कमल हसन, ‘कॅप्टन’ विजयकांत यांसारख्या चित्रपट अभिनेत्यांनीही राजकारणाची स्वप्ने जोपासली; पण कोणाला पदार्पणापूर्वीच माघार घ्यावी लागली, तर कोणाच्या पदरी अपयश आले ! मग विजय यांनी वेगळे काय केले? त्यांनी चित्रपटांसोबतचे नाते पूर्णपणे तोडले! एका चित्रपटासाठी सुमारे २५० कोटी रुपये मानधन आकारणाऱ्या अभिनेत्याचा हा त्याग जनतेला भावला. दुटप्पीपणा नाही, अर्धवट वचनबद्धता नाही ! जनतेने त्यावर विश्वास ठेवला. ‘टीव्हीके’ची संघटनात्मक बांधणी अनोखी आहे. विजय यांनी २००९ मध्येच त्यांच्या ८५ हजारांहून अधिक फॅन क्लबना ‘विजय मक्कल इयक्कम’ या छत्राखाली आणले होते. त्यामुळे स्थापनेवेळीच पायाभूत संघटना तयार होती. ‘टीव्हीके’ने ‘मध्य-डाव्या’ विचारधारेचा स्वीकार करत, आंबेडकर, पेरियार, कामराज यांना प्रेरणास्थान मानले.
‘धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि लोकशाही’ हा त्रिसूत्री जाहीरनामा विजय यांनी २०२४ मध्ये घोषित केला. त्यांनी भारतीय जनता पक्षाला ‘वैचारिक विरोधक’ आणि द्रमुकला ‘भ्रष्टाचार व घराणेशाहीमुळे राजकीय प्रतिस्पर्धी’ संबोधत नि:संदिग्ध भूमिका घेतल्याने, मतदारांना स्पष्ट पर्याय मिळाला. विधानसभा निवडणुकीत ८५.१ टक्के मतदान झाले. तामिळनाडूच्या इतिहासातील सर्वाधिक ! त्याचा अर्थ हा, की निराश युवा मतदार मतदानासाठी बाहेर पडला. ‘टीव्हीके’च्या जाहीरनाम्यातील नशामुक्त तामिळनाडू, रोजगार हमी, शिक्षण कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांना मासिक आर्थिक मदत, हे मुद्दे तरुणांच्या हृदयाला स्पर्श करणारे होते. सप्टेंबर २०२५ मध्ये विजय यांच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ती दुर्घटना राजकीयदृष्ट्या विनाशकारी ठरू शकली असती; पण विजय यांनी तत्काळ माफी मागितली, पीडित कुटुंबांना आर्थिक मदत दिली आणि प्रचार तात्पुरता थांबवला.
मतदारांनी विजय यांच्या त्या संवेदनशीलतेला दाद दिली. खऱ्या नेतृत्वाची परीक्षा संकटात होते. विजय ती उत्तीर्ण झाले ! ‘टीव्हीके’ला बहुमतासाठी १० जागा कमी पडत असल्याने सरकार गठनासाठी तडजोडी कराव्या लागतील. ती विजय यांची मोठी परीक्षा असेल. मोठ्या अपेक्षा निर्माण केलेले नवे पक्ष सत्तेत आल्यानंतर जुन्याच मार्गाने चालू लागतात, ही रीत बदलून मतदारांचा विश्वास जपणे हे त्यांच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान असेल. जनतेने रुपेरी पडद्यावरील नायकाला प्रत्यक्षातील नायक बनवले आहे. आता त्याचा ‘खलनायक’ न होऊ देण्याची जबाबदारी विजय यांची आहे. त्यांचे यश हा एका ‘सेलेब्रिटी’चा नव्हे, तर व्यवस्था बदलण्याचा निश्चय केलेल्या माणसाचा विजय आहे. जनतेशी प्रामाणिक आणि निश्चय अटल असल्यास, कोणताही प्रस्थापित गड अजिंक्य नाही, हा संदेश ‘टीव्हीके’च्या विजयाने सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांना दिला आहे !