-मोहन बारहातेमानवत (जि.परभणी) :परभणी-मनमाड रेल्वे मार्गावरील मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी सिग्नल यंत्रणेत बिघाड करून साईनगर शिर्डी एक्सप्रेस (रेल्वे क्र. १७२०६) रोखली. रेल्वे थांबताच चोरट्यांनी जनरल डबा आणि आरक्षित डब्यात प्रवेश करून दोन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने लंपास केले. (रेल्वे पोलिसांचे म्हणणे की चोरट्यांनी खालूनच खिडकीद्वारे चोरी केली. मात्र, रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली नसल्याने रेल्वे रुळापासून त्यांचे हात प्रवाशांपर्यंत पोहोचणे शक्य नाही). या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सिग्नलशी केली छेडछाडसाईनगर शिर्डी एक्सप्रेसला मानवतरोड येथे थांबा नाही. ही गाडी पहाटे २.५५ च्या सुमारास स्थानकात येण्यापूर्वीच ज्ञात चोरट्यांनी सिग्नल युनिट एस– १ ए ची केबल कापून सिग्नल यंत्रणा निकामी केली. चालकाला होम सिग्नल डेंजर दिसल्याने त्याने खबरदारी म्हणून गाडी प्लॅटफॉर्मच्या काही अंतरावरच थांबवली. याच संधीचा फायदा घेत दरोडेखोरांनी डब्यांवर हल्ला चढवला.
महिला प्रवाशांना लक्ष्य केलेरेल्वे थांबल्यानंतर चोरट्यांनी जनरल डब्यातील एका महिलेच्या गळ्यातील २ ग्रॅमचे मंगळसूत्र ओढले. त्यानंतर त्यांचा मोर्चा राखीव डब्यांकडे वळला. एस-४ क्रमांकाच्या डब्यात प्रवास करणाऱ्या जे. उषा (रा.आंध्र प्रदेश) या महिलेच्या गळ्यातील ८ ग्रॅमचे लॉकेट आणि ८ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्यांनी जबरदस्तीने काढून घेतले. रात्रीची वेळ असल्याने बहुतांश डब्यांचे दरवाजे आतून बंद होते. ज्यामुळे चोरट्यांना सर्व डब्यांत शिरता आले नाही आणि मोठा अनर्थ टळला.
तपासासाठी श्वान पथक पाचारणघटनेची माहिती मिळताच आरपीएफचे श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. आरपीएफ क्राईम ब्रँचचे उपनिरीक्षक दिलीप कांबळे, जीआरपीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश जोगदंड व त्यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेमुळे रेल्वे वाहतूक तब्बल ४० मिनिटे खोळंबली होती. सिग्नल यंत्रणा दुरुस्त झाल्यानंतर रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली. पीडित महिला प्रवासी जे. उषा यांनी छत्रपती संभाजीनगर रेल्वे पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदवल्याची माहिती शैलेश जोगदंड यांनी दिली.
प्रवासी संघटनेची संतापजनक प्रतिक्रियामानवतरोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची सुरक्षा वारंवार धोक्यात येत आहे. येथे कायमस्वरूपी रेल्वे पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने अनेकदा केली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चोरट्यांचे धाडस वाढले असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Web Summary : Thieves stopped the Shirdi Express near Manvat Road by cutting signal cables. They robbed two women of gold jewelry. Railway security is questioned as passengers express outrage.
Web Summary : मानवत रोड के पास सिग्नल केबल काटकर चोरों ने शिरडी एक्सप्रेस को रोका। उन्होंने दो महिलाओं से सोने के गहने लूट लिए। यात्रियों के आक्रोश के साथ रेलवे सुरक्षा पर सवाल।