Karnataka Crime: गावकऱ्यांचे टोमणे आणि संशयाने एका बापाने आपल्या सहा वर्षांच्या निरागस मुलाची निर्घृण हत्या केली. मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही, या गावातील लोकांच्या वारंवारच्या टोमण्यांमुळे संतप्त झालेल्या पित्याने पोटच्या मुलाला शाळेत प्रवेश घेण्याच्या बहाण्याने नेऊन चक्क कराड इथल्या कृष्णा नदीत ढकलून दिले. या हृदयद्रावक घटनेने कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
सिद्धार्थ मल्लिकार्जुन आरेकेरी (वय ६ वर्षे) असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. तो कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील नागठाणे गावातील रहिवासी होता. त्याचा पिता मल्लिकार्जुन आरेकेरी याला गेल्या दीड वर्षांपासून मुलाच्या दिसण्यावरून संशय होता. मुलाचा चेहरा आपल्याशी जुळत नसल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले.
१६ मार्च रोजी घडला थरार
मल्लिकार्जुनने पत्नी भाग्यश्रीला सांगितले की, तो सिद्धार्थला शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी घेऊन जात आहे. त्याने मुलाला नवीन कपडे घातले आणि मोठ्या प्रेमाने विजापूरहून महाराष्ट्रातील कराड येथे आणले. कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर परिसरात कृष्णा नदीच्या पात्राजवळ नेऊन, त्याने कोणालाही कळण्यापूर्वी सिद्धार्थला नदीच्या पात्रात ढकलून दिले. मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आणि बाप शांतपणे घरी परतला.
वाढदिवसाच्या दिवशीच गुपित उघड झाले
घरी परतल्यानंतर मल्लिकार्जुनने बनाव रचला की, त्याने सिद्धार्थला सिंदगी येथील एका शालेय वसतिगृहात दाखल केले आहे. मात्र, १ एप्रिल रोजी सिद्धार्थचा वाढदिवस असल्याने आई भाग्यश्री त्याला घरी आणण्यासाठी मागे लागली. मल्लिकार्जुन वारंवार उत्तरे टाळू लागला आणि काहीतरी सांगून वेळ मारून नेऊ लागला. संशय बळावल्याने भाग्यश्रीने पोलिसांत धाव घेतली.
पोलिसांनी सुरु केला तपासविजापूर ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू करताच मल्लिकार्जुन बेपत्ता झाला, ज्यामुळे संशय अधिकच गडद झाला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याचे लोकेशन १६ मार्च रोजी कराडमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
कराड पोलिसांनी मृतदेह आधीच शोधला होता
योगायोगाने, १८ मार्च रोजी कराड पोलिसांनी नदीकाठी एका अनोळखी मुलाचा मृतदेह सापडल्याची नोंद केली होती. विजापूर पोलिसांनी पाठवलेले सिद्धार्थचे फोटो आणि कराड पोलिसांनी नोंदवलेला मृतदेह यांची ओळख पटली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या अनेक महिन्यांपासून या संशयाने ग्रासलेला होता. संशय दूर करण्यासाठी डीएनए चाचणीसारखे कायदेशीर मार्ग उपलब्ध असतानाही, त्याने केवळ रागाच्या भरात एका निष्पाप जीवाचा बळी घेतला.
"हा गुन्हा अत्यंत नियोजनबद्ध आणि क्रूर आहे. केवळ मुलाचा चेहरा स्वतःशी मिळत नाही या संशयावरून आरोपीने हे कृत्य केले आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला घटनास्थळी नेऊन अधिक तपास केला जात आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली.
गावात शोककळा आणि संताप
नागठाणे गावात या घटनेनंतर स्मशानशांतता पसरली आहे. आपल्या मुलाला नवीन कपडे घालून स्वतःच्या हाताने मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्या बापाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
Web Summary : Fueled by taunts, a father murdered his six-year-old son in Karad, suspecting the child's appearance. He lured him to Krishna river under the pretext of school admission, pushing him to his death. The incident has caused outrage.
Web Summary : तानों से परेशान होकर, एक पिता ने कराड में अपने छह साल के बेटे की हत्या कर दी, क्योंकि उसे बच्चे की शक्ल पर शक था। स्कूल में दाखिले के बहाने कृष्णा नदी में ले जाकर उसे मौत के घाट उतार दिया। इस घटना से आक्रोश है।