Vedanta Chhattisgarh Boiler Explosion: छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातून एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे. डभरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंघीतराई ग्रामपंचायत स्थित वेदांता पॉवर प्लांटमध्ये १४ एप्रिल रोजी झालेल्या भीषण बॉयलर स्फोटातील मृतांची संख्या आता २० वर पोहोचली आहे. या गंभीर घटनेबाबत पोलिसांनी कडक भूमिका घेत वेदांता कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, व्यवस्थापक देवेंद्र पटेल आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
स्फोटाचं कारण काय?
पोलीस आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या प्राथमिक तपासानुसार, १४ एप्रिल रोजी दुपारी अडीचच्या सुमारास प्लांटमधील बॉयलर क्रमांक-१ मध्ये स्फोट झाला. बॉयलर मुख्य निरीक्षक आणि एफएसएल (FSL) अहवालात असा खुलासा झाला आहे की, बॉयलर फर्नेसच्या आत मोठ्या प्रमाणात इंधन जमा झालं होतं. यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड दाबामुळे बॉयलरचा खालचा पाईप निखळला आणि जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे तेथे उपस्थित असलेल्या कामगारांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.
घटनेतील मुख्य तपशील
- छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यात १४ एप्रिल रोजी मोठी दुर्घटना घडली.
- वेदांता पॉवर प्लांटमध्ये दुपारी अचानक बॉयलरचा स्फोट झाला.
- अपघातात २० कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार जखमी झालेत.
- तपासात देखभाल, सुरक्षा आणि मेंटेनन्समध्ये गंभीर निष्काळजीपणा आढळलाय.
- या प्रकरणी वेदांताच्या संचालकांवर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.
सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष
वेदांता कंपनी आणि एनजीएसएलद्वारे मशिनरीची देखभाल आणि संचलन मानकांचं पालन केलं गेलं नसल्याचं तपासात निष्पन्न झालंय. सुरक्षा नियमांकडे केलेले दुर्लक्ष आणि उपकरणांच्या देखभालीतील हलगर्जीपणा हेच या मोठ्या अपघाताचं मुख्य कारण ठरलंय.
प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई
पोलीस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर यांच्या निर्देशानुसार डभरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११९/२०२६ अंतर्गत बीएनएसच्या कलम १०६(१), २८९ आणि ३(५) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसपींनी एक विशेष पथक स्थापन केलं असून, पोलीस अधीक्षक पंकज पटेल या पथकाचे नेतृत्व करतील.
मदत आणि बचाव कार्य
या अपघातात जखमी झालेल्या कामगारांवर रायगड येथील मेडिकल कॉलेज, अपेक्स आणि मेट्रो हॉस्पिटलसह इतर केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासनाकडून पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीनं सविस्तर तपास सुरू असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
Web Summary : A boiler explosion at a Vedanta power plant in Chhattisgarh killed 20. Negligence in maintenance and safety standards led to the accident. Police filed an FIR against Anil Agarwal and other officials for negligence and violation of safety norms. Investigation is underway.
Web Summary : छत्तीसगढ़ के वेदांता पावर प्लांट में बॉयलर विस्फोट से 20 की मौत। रखरखाव और सुरक्षा में लापरवाही के चलते हादसा। अनिल अग्रवाल समेत अन्य अधिकारियों पर एफआईआर दर्ज। लापरवाही और सुरक्षा नियमों के उल्लंघन का आरोप। जांच जारी है।