मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत भारताने आता जागतिक स्तरावर कडक भूमिका घेतली आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीतील वाढते धोके आणि व्यापारी टँकर्सना मिळणाऱ्या धमक्यांचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला असून, या भागात त्वरित शांतता आणि सुरक्षित वाहतूक पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.
भारतीय खलाशांचा बळी; भारताने व्यक्त केला संताप
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वथनेनी हरीश यांनी भारताची बाजू मांडली. "या संघर्षात व्यापारी जहाजांना लष्करी हल्ल्यांचे लक्ष्य केले जाणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. या हल्ल्यांमध्ये जहाजांवरील निष्पाप भारतीय खलाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, ही भारतासाठी चिंतेची आणि दुखाची बाब आहे," असं ते म्हणाले.
होर्मुजची सामुद्रधुनी का महत्त्वाची?होर्मुजची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग मानला जातो. ओमान आणि इराण दरम्यान असलेला हा चिंचोळा मार्ग जागतिक तेल पुरवठ्याची जीवनवाहिनी आहे. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या व्यापारापैकी जवळपास २० ते ३० टक्के तेल याच मार्गाने वाहून नेले जाते. भारताची ऊर्जा सुरक्षा मोठ्या प्रमाणावर या मार्गावर अवलंबून आहे. त्यामुळे या भागात होणारी कोणतीही अडवणूक जागतिक स्तरावर महागाई आणि इंधन टंचाई निर्माण करू शकते.
भारताने मांडलेले प्रमुख मुद्दे
होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारी आंतरराष्ट्रीय व्यापार वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहिली पाहिजे, अशी भूमिका भारताने मांडली. नागरी जहाजांना लक्ष्य करणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असून ते कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचेही भारताने म्हटलं. इराण आणि आखाती देशांमधील तणाव कमी करण्यासाठी सर्व देशांनी संयम पाळावा आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढावा. तसे सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर राखला जावा, असे भारताने ठामपणे सांगितले.
भारताचा वाढता पुढाकार
गेल्या काही महिन्यांपासून अरबी समुद्र आणि लाल समुद्रात जहाजांवर होणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय नौदलाने आधीच ऑपरेशन संकल्प अंतर्गत आपल्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. यातूनच संयुक्त राष्ट्रात भारताने कठोर इशारा दिला आहे.
Web Summary : India strongly condemns attacks on commercial ships in Hormuz Strait, demanding safe passage. Indian sailors' deaths are a concern. The Strait is vital for oil supply. India advocates for unimpeded trade, respect for sovereignty, and de-escalation, already deploying warships for security.
Web Summary : भारत ने होर्मुज जलडमरूमध्य में वाणिज्यिक जहाजों पर हमलों की कड़ी निंदा की, सुरक्षित मार्ग की मांग की। भारतीय नाविकों की मौत चिंता का विषय है। यह जलडमरूमध्य तेल आपूर्ति के लिए महत्वपूर्ण है। भारत निर्बाध व्यापार, संप्रभुता के सम्मान और तनाव कम करने की वकालत करता है, सुरक्षा के लिए पहले से ही युद्धपोत तैनात कर रहा है।