नवी दिल्ली - अमेरिका इस्रायलनं इराणवर संयुक्त हल्ला केल्यानंतर मध्य पूर्वेत युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. या तणावात तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या. त्यातून काहीसा दिलासा देण्यासाठी अमेरिकेने रशिया आणि इराणवरील तेलाचे निर्बंध तात्पुरते हटवले होते. त्यानंतर भारत आणि अन्य देशांनी या देशांकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केली. परंतु आता अमेरिकेने निर्बंधातून दिलेली सूट संपुष्टात आणली आहे. त्यानंतर भारताला ऊर्जा पुरवठ्यासाठी नव्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी १५ एप्रिलला सांगितले की, अमेरिकेकडून रशिया आणि इराणच्या तेल आयातीच्या निर्बंधावरील सूट वाढवू शकत नाही. आम्ही रशिया, इराणी तेलावरील निर्बंध पुन्हा लावू. ही सूट केवळ त्याच जहाजांना दिली होती. जे ११ मार्च आधी समुद्रात होते. १२ मार्चपूर्वी लोड केलेले रशियन कार्गोसाठी ३० दिवसांपुरते दिलेली सूट आता समाप्त झाली आहे. इराणी तेलाला दिलेली सूट १९ एप्रिलला संपेल. अमेरिकेने निर्बंधात दिलेल्या सूटमुळे रशियाकडून मागील महिन्यात भारताने तेल खरेदी वाढवली होती. मार्च २०२६ मध्ये रशियाकडून कच्चे तेल आयातीत गेल्या ९ महिन्याच्या तुलनेत उच्चांक खरेदी करण्यात आली. परंतु आता हे निर्बंध पुन्हा लागू झाल्याने तेल आयातीवर भारत काय भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे.
आता भारत कुठून आणणार तेल?
होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यानंतरही भारताने तेल आयातीत वैविध्यता आणली होती. कच्च्या तेलाची खरेदी हा एक तांत्रिक-व्यावसायिक निर्णय आहे आणि तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) आधीच ४० हून अधिक देशांमध्ये आपल्या ऊर्जा स्रोतांची आयात वैविध्यपूर्ण केली आहे. भारताची आपत्कालीन योजना आता आखाती प्रदेशाबाहेर आणि होर्मुझच्या अरुंद खाडीच्या पलीकडे असलेल्या पुरवठादारांवर लक्ष केंद्रित करेल. या यादीत लॅटिन अमेरिका अग्रस्थानी आहे, त्यानंतर ब्राझील, कोलंबिया आणि इक्वेडोर यांचा क्रमांक लागतो, जे भारतीय तेल शुद्धीकरण प्रकल्पांसाठी अधिकाधिक महत्त्वाचे पुरवठादार बनले आहेत तर गयाना जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या नवीन तेल निर्यातदारांपैकी एक म्हणून झपाट्याने उदयास आला आहे.
आफ्रिकन देशांतूनही आयात वाढणार
दरम्यान, पश्चिम आफ्रिकेची भूमिकाही तेल आयातीत वाढण्याची शक्यता आहे. नायजेरिया, अंगोला या देशातून तेल आयात होऊ शकते. भारतीय तेल उत्पादक कंपन्या अमेरिकेकडूनही कच्च्या तेलाची खरेदी वाढवू शकतात. परंतु यापैकी कोणताही पर्याय स्वस्त दरात रशियन तेलाची पूर्णपणे जागा घेऊ शकत नाही. ते फक्त भारताला रशियन आणि इराणी तेलावरील निर्बंध शिथिलतेची मुदत संपल्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी मदत करू शकतात. मात्र यामुळे भारताचा आयात खर्च वाढू शकतो.
Web Summary : US ends waivers on Russian, Iranian oil, posing new import challenges for India. India seeks diverse sources, including Latin America and Africa, potentially increasing import costs.
Web Summary : अमेरिका ने रूसी, ईरानी तेल पर छूट खत्म की, भारत के लिए नई आयात चुनौतियां। भारत लैटिन अमेरिका, अफ्रीका सहित विभिन्न स्रोतों की तलाश में, संभावित रूप से आयात लागत बढ़ेगी।