एक खोली, ५ मृतदेह अन् सर्वांच्या कपाळावर मारलेली गोळी..; या घटनेने पोलिसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 11:53 IST2026-01-20T11:52:23+5:302026-01-20T11:53:18+5:30
UP Crime: एकाच कुटुंबातील सर्वांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

एक खोली, ५ मृतदेह अन् सर्वांच्या कपाळावर मारलेली गोळी..; या घटनेने पोलिसही चक्रावले
UP Crime: उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात एका कुटुंबातील पाच जणांचे संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका बंद खोलीत अशोक, त्यांची पत्नी अंजिता, आई विद्यावती तसेच दोन अल्पवयीन मुले कार्तिक आणि देव यांचे मृतदेह सापडले आहेत. विशेष म्हणजे, सर्वांच्या कपाळावर गोळी मारण्यात आली आहे.
घटनास्थळावरून तीन देशी बनावटीच्या बंदुका जप्त करण्यात आल्या असून, प्राथमिक तपासात अशोक यांनी आधी आई, पत्नी व दोन्ही मुलांची हत्या करून नंतर आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. अशोक व त्यांच्या पत्नीचे मृतदेह खोलीतील जमिनीवर, तर आई आणि दोन्ही मुले पलंगावर आढळली.
कर्ज, मानसिक तणाव आणि कौटुंबिक वाद
पोलिसांकडून या प्रकरणाचा कर्जबाजारीपणा, नोकरीशी संबंधित तणाव, कौटुंबिक वाद किंवा मानसिक दबाव या सर्व शक्य कारणांच्या अनुषंगाने तपास केला जात आहे. कुटुंबात कोणत्याही कारणावरून वाद झाला होता का, रागाच्या भरात गोळीबार झाला का, याचाही शोध घेतला जात आहे. त्याचबरोबर, कोणीतरी बाहेरील व्यक्ती घरात घुसून ही घटना घडवली का, या शक्यतेलाही पोलिसांनी नाकारलेले नाही. कुटुंबाचे कोणाशी आर्थिक व्यवहार, वाद किंवा वैर होते का, याची सखोल चौकशी सुरू आहे.
CCTV तपासणी, मोबाईल जप्त
परिसरातील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, शेजाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी केली असून, घर सील करण्यात आले आहे. मृतकांचे सर्व मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पोलीस प्रशासनाकडून प्रकरणाच्या प्रत्येक अंगाने तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
शांत स्वभावाचे कुटुंब, कोणताही वाद नव्हता
मृतक अशोक हे नकुड तहसीलमध्ये कार्यरत होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांना मृतक आश्रित कोट्यातून नोकरी मिळाली होती. त्यांचा मुलगा देव एका खासगी शाळेत इयत्ता ९ वी, तर कार्तिक इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत होता. शेजाऱ्यांच्या माहितीनुसार, हे कुटुंब अतिशय शांत आणि सभ्य स्वभावाचे होते. कोणाशीही वाद किंवा भांडण असल्याची माहिती समोर आलेली नाही.