नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या ‘नीट-यूजी २०२६’ परीक्षेवरून सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता या वादात एक खळबळजनक वळण आले असून, बायोलॉजी आणि केमिस्ट्रीनंतर भौतिकशास्त्राचे प्रश्नदेखील एका संशयास्पद 'गेस पेपर'शी तंतोतंत जुळत असल्याचा दावा केला जात आहे.
विशेष म्हणजे, प्रश्नांमधील आकडे, शब्दरचना आणि अगदी 'कॉमा-फुलस्टॉप' देखील हुबेहूब असल्याने ही साधी योगायोगाची घटना नसून मोठा कट असल्याचे बोलले जात आहे. हा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
काय आहे नेमकं प्रकरण?
राजस्थान पोलिसांनी जप्त केलेल्या एका ४१० प्रश्नांच्या 'गेस पेपर'मधील तब्बल १३५ प्रश्न मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आल्याचे समोर आले आहे. यामध्ये जीवशास्त्राचे ९० पैकी ९० आणि रसायनशास्त्राचे ४५ पैकी ४५ प्रश्न मॅच झाले आहेत.
आता भौतिकशास्त्राच्या प्रश्नांबाबतही तज्ज्ञांनी संशय व्यक्त केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्नांची पुनरावृत्ती होणे हे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करते.
५ लाखांपासून २५ हजारांपर्यंत विक्री
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, हा तथाकथित 'गेस पेपर' सुरुवातीला ५ लाख रुपयांना विकला जात होता. जशी परीक्षेची वेळ जवळ आली, तशी त्याची किंमत कमी होऊन ती २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत खाली आली होती.
या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कथित पेपरसाठी लाखो रुपयांची मागणी करण्यात आल्याची चर्चा असून, काही विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम उकळल्याचेही आरोप आहेत.
नाशिकमधूनही प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचा संशय
टेलिग्राम व व्हाटस्अपवर परिक्षेपूर्वी नीट परिक्षेची प्रश्नपत्रिका व्हायरल झाली हाेती. या कार्यात शुभमचा हात असल्याचा संशय असून नाशिकमध्ये राहून त्याने इतर ठिकाणी पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका व्हायरल केली असल्याचा संशय आहे.
त्या अनुशंगाने देखील शुभमची सीबीआय चौकशी करणार आहे. शुभमच्या मोबाइलसह त्याच्या लॅपटापमधून या संदर्भातील काही धागेदारे हाती लागण्याची शक्यता आहे.
नाशिकमधून पेपर थेट गुरुग्रामच्या डॉक्टरकडे
नाशिकमधील एका प्रिंटिंग प्रेसधून नीट-युजी परीक्षेची प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका लीक झाली आणि ती गुरुग्राममधील एका डॉक्टरपर्यंत पोहोचवण्यात आली, असा संशय पोलीस सूत्रांनी मंगळवारी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. या संदर्भात 'इंडियन मेडिकल असोसिएशन' गुरुग्रामचे अध्यक्ष डॉ. राजेश कटारिया यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, गुरुग्राममधील एका डॉक्टरचा सहभाग असल्याचे वृत्त चर्चेत असले तरी, कोणत्याही तपास यंत्रणेने अद्याप
स्थानिक वैद्यकीय संघटनेशी अधिकृतपणे संपर्क साधलेला नाही.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, गुरुग्राममधील एका डॉक्टरला ही फुटलेली प्रश्नपत्रिका मिळाल्याचा आरोप आहे, परंतु ही अद्याप तपासाधीन बाब आहे.
एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
केवळ एका पेपर लीकच्या माध्यमातून सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा दावा केला जात आहे. हा काळाबाजार एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे 'पिरॅमिड' स्वरूपात चालतो.
या साखळीत सर्वात वरच्या स्थानी टोळीचा मास्टरमाईंड असतो, जो थेट छपाई किंवा वाहतूक यंत्रणेत मदत करता. दुसऱ्या स्तरावर कोचिंग सेंटर्सचे मालक आणि हॉस्टेल चालक असतात, जे गरजू पालकांशी संपर्क साधतात.
सर्वात खालच्या स्तरावर 'स्थानिक एजंट' म्हणून एमबीबीएस विद्यार्थी आणि परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांचा वापर केला जातो.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा सौदा
एका अहवालानुसार, मास्टरमाईंडकडून पेपरच्या 'घाऊक' विक्रीसाठी ५ ते १० कोटी घेतले जातात. पुढे हेच पेपर स्थानिक स्तरावर ५ लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत विद्यार्थ्यांना विकले जातात. ज्या विद्यार्थ्यांना पेपर प्रत्यक्ष देता येत नाही, त्यांच्यासाठी 'सॉल्व्हर गँग' १०-१५ लाखांत डमी उमेदवार उभा करते.
कसे आहे नेटवर्क?
या प्रकरणात काही संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. परीक्षा केंद्रांशी संबंधित काही व्यक्ती, कोचिंग नेटवर्क आणि मध्यस्थ यांच्या भूमिकेची तपास यंत्रणांकडून पडताळणी केली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावरील व्यवहार, चॅट्स आणि आर्थिक देवाणघेवाणीची माहितीही तपासली जात आहे.
प्रमुख वाद: पेपरफुटीचे गंभीर आरोप
२०२४ : बिहारच्या पाटणा येथे पेपरफुटीचा मोठा घोटाळा समोर आला होता. प्रश्नपत्रिकेसाठी उमेदवारांकडून ३० ते ५० लाख रुपये घेतले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
२०१५ : नीटच्या आधी होणाऱ्या एआयपीएमटी परीक्षेतही १० राज्यांमध्ये पेपर लीक झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ती परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश दिले होते.
Web Summary : NEET-UG 2026 exam faces controversy as physics questions match a 'guess paper'. A Rajasthan police investigation revealed 135 identical questions. The paper, initially sold for ₹5 lakhs, dropped to ₹25,000. A printing press in Nashik leaked the paper to a doctor in Gurugram. The scam involved ₹100 crore turnover.
Web Summary : नीट-यूजी 2026 परीक्षा में विवाद, भौतिकी के प्रश्न 'गेस पेपर' से मेल खाते हैं। राजस्थान पुलिस की जांच में 135 प्रश्न समान पाए गए। पेपर पहले ₹5 लाख में बिका, फिर ₹25,000 तक गिर गया। नासिक के एक प्रिंटिंग प्रेस से पेपर लीक होकर गुरुग्राम के एक डॉक्टर तक पहुंचा। घोटाले में ₹100 करोड़ का कारोबार शामिल है।