मुंबई/नाशिक : नीट यूजी परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीची व्याप्ती देशभर पसरली आहे. त्याचे आता महाराष्ट्र कनेक्शनही पुढे आले आहे. या प्रकरणात लातूर, पुणे व नाशिकमध्ये खासगी क्लासेस व समुपदेशकांच्या माध्यमातून ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. सराव परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत विचारण्यात येणारे प्रश्न दिल्याचे आता समोर आले आहे.
अनेक नामांकित क्लासेसमध्ये नीट परीक्षेचे प्रश्न विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्यामध्ये लातूरमधील दोन तर पुण्यातील एका क्लासने नीट परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. खासगी कोचिंग क्लासेसने पेपर फोडण्याचे कारस्थान रचले, अशी माहिती पालक प्रतिनिधी सुधा शेनॉय यांनी दिली.
पेपर फुटीप्रकरणी नाशिकमधून एक जण ताब्यात; १५ लाख प्रति कॉपी विकल्या
‘नीट’ पेपरच्या फुटीचे ‘नाशिक कनेक्शन’ समोर आले आहे. या प्रकरणी संशयित बीएएमएसचा विद्यार्थी शुभम मधुकर खैरनार (२६) यास सीबीआयच्या निर्देशानुसार मंगळवारी सकाळी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. फुटलेल्या पेपरची प्रत्येकी तब्बल १५ लाख रुपयांना विक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पेपर फुटीच्या साखळीतील एक कडी म्हणून आरोपी असलेला शुभम हा मुळचा नांदगावचा असून काही दिवसांपासून तो शहरातील इंदिरानगर परिसरात वास्तव्यास आहे. भोपाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा तो विद्यार्थी होता.
राज्यातून बाराहून अधिक संशयितांना अटक करण्यात आली. त्यातील शुभम नाशिकमध्ये सुचेतानगरात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील महिला डॉक्टरच्या मालकीच्या थ्री बीचएचके फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता.
राजस्थान सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी मंगळवारी सकाळी ७ वाजता संपर्क साधून शुभमचा तपास करण्याची विनंती केली होती.
पोलिसांनी जलद गतीने शुभमचा शोध घेत त्यास ताब्यात घेतले. शुभमला ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचे पथक मंगळवारी रात्री ८ वाजता नाशिकमध्ये पोहोचले. शुभमची रात्री उशिरापर्यंत सीबीआयकडून कसून चौकशी सुरु होती.
मंदिरात जातो म्हणाला अन् जाळ्यात अडकला
शुभमने मी मंदिरात जाऊन येतो, असे या दोघांना सांगितले होते. मात्र दुपारी १२ वाजले तरी शुभम घरी आला नाही. शुभमला पोलिसांनी बाहेरच्या बाहेर ताब्यात घेतले. ओळख लपवण्यासाठी शुभम एके दिवशी डोक्यावरील केस कापून घरी आला. तेव्हा आजी वारल्याने केस कापल्याचे त्याने रूममधील दोघा मित्रांना सांगितले होते.
लिखित प्रश्न पीडीएफच्या माध्यमातून प्रसारित
परीक्षेपूर्वी काही दिवस आधी लिखित पीडीएफ काही समुपदेशकांना मिळाल्या होत्या. एका पीडीएफमध्ये ६०० प्रश्न होते. त्यातील १५० प्रश्न नीट परीक्षेत आले.
अन्य एका ठिकाणी पीडीएफमध्ये बायोलॉजी विषयाचे ९० प्रश्न होते. त्यातील ७२ प्रश्न नीटमध्ये आले होते. तर रसायनशास्त्र विषयाचे ४५ प्रश्न सराव परीक्षेत विचारण्यात आले होते. त्यातील ४२ प्रश्न नीट परीक्षेत आले होते, असे एका समुपदेशकाने सांगितले.
Web Summary : NEET paper leak spreads; Maharashtra connection surfaces. Latur, Nashik, Pune coaching centers involved. A Nashik suspect arrested for selling copies for ₹15 lakh each. Practice paper questions appeared in the actual NEET exam.
Web Summary : नीट पेपर लीक का मामला फैला; महाराष्ट्र कनेक्शन सामने आया। लातूर, नाशिक, पुणे कोचिंग सेंटर शामिल। नासिक के एक संदिग्ध को 15 लाख रुपये प्रति कॉपी बेचने के आरोप में गिरफ्तार किया गया। अभ्यास पेपर के प्रश्न नीट परीक्षा में आए।