Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 06:21 IST

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिका-इराण तणाव आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे भारतीय बाजारावर दबाव; वाढत्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी चिंता

मुंबई : भारतीय शेअर बाजारात मंगळवारी सलग चौथ्या सत्रात मोठी घसरण नोंदवली गेली. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली तीव्र वाढ, पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाला. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास दोन टक्क्यांनी घसरले. 

बीएसई सेन्सेक्स तब्बल १,४५६.०४ अंकांनी घसरून ७४,५५९.२४ वर बंद झाला. तर निफ्टी ४३६.३० अंकांनी घसरून २३,३७९.५५ वर स्थिरावला. दोनच दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल १७.३० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

विश्लेषकांच्या मते, महागणारे तेल, कमजोर रुपया आणि सततची परदेशी विक्री या “ट्रिपल हिट”मुळे भारतीय बाजारांवरील दबाव अधिक तीव्र झाला आहे.

आयटी क्षेत्रावर अतिरिक्त दबाव

वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला आहे. त्यातच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री सुरू असल्याने बाजारावर दबाव वाढला.

सलग ४ दिवसांत मोठे नुकसान

गेल्या चार व्यवहार सत्रांत सेन्सेक्स तब्बल ३,३९९ अंकांनी म्हणजेच ४.३६ टक्क्यांनी घसरला आहे. निफ्टीतही ९५१ अंकांची म्हणजेच ३.९१ टक्क्यांची घसरण झाली आहे.

तेल भडकले अन् रुपया सार्वकालिक नीचांकावर

मंगळवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ३५ पैशांनी घसरून ९५.६३ या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला. त्याचवेळी ब्रेंट क्रूड तेलाचा दर २.७५ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल १०७.१ डॉलरवर पोहोचला.

जागतिक बाजारातही अस्थिरता वाढली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम अत्यंत कमकुवत स्थितीत असल्याचे वक्तव्य केल्यानंतर जागतिक बाजारातही अस्थिरता वाढली आहे. पश्चिम आशियातील परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये वाढत आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Market Crash: ₹17 Lakh Crore Lost; Sensex Plunges, Rupee Falls

Web Summary : Indian markets crashed amid rising oil prices and geopolitical tensions. Sensex fell sharply, investors lost ₹17.30 lakh crore in two days, and the rupee hit a record low due to foreign investor selling.
टॅग्स :स्टॉक मार्केटशेअर बाजारयुद्धनरेंद्र मोदी