'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 05:51 IST2026-05-14T05:50:25+5:302026-05-14T05:51:45+5:30
Neet Paper Leak CBI Case Update: देशभरात अनेक ठिकाणी कारवाई; संशयितांकडून मोबाइल, लॅपटॉपसह अनेक डिजिटल उपकरणे जप्त, विविध ठिकाणी आंदोलने

'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
नवी दिल्ली/जयपूर : नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने पाच जणांना अटक केली असून देशभरातील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये (एनटीए) संपूर्ण बदल करण्याची आणि तिच्या जागी “तांत्रिकदृष्ट्या प्रगत व स्वायत्त संस्था” स्थापन करण्याची मागणी केली.
नीट परीक्षा प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले असून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने अटक करण्यात आलेल्या काही जणांचे भाजपशी संबंध असल्याचा दावा केला.
सीबीआयने जयपूरमधून मंगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल, गुरुग्राममधून यश यादव आणि नाशिकमधून शुभम खैरनार यांना अटक केली असून इतर अनेक संशयितांची विविध शहरांत चौकशी सुरू आहे.
सीबीआयने छाप्यांत संशयितांकडून मोबाइल, लॅपटॉपसह अनेक डिजिटल उपकरणे जप्त केली. सीबीआयने एनटीए मुख्यालयाला भेट देऊन संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली.
ताशेऱ्यांनंतरही सुधारणा न झाल्याने पेपरफुटी?
संसदेच्या शिक्षण, महिला, बाल, युवा आणि क्रीडाविषयक स्थायी समितीने सहा महिन्यांपूर्वीच्या अहवालात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) कारभारावर कठोर ताशेरे ओढले होते.
‘एनटीए’ने २०२४ मध्ये घेतलेल्या विविध परीक्षांमध्ये पेपरफुटी, परीक्षा पुढे ढकलणे, निकालातील विलंब आणि प्रश्नपत्रिकांतील चुका यांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास कमी झाल्याचे समितीने यामध्ये स्पष्ट केले होते. त्यानंतरही ‘एनटीए’च्या कारभारात सुधारणा झाली नसून त्यातून ही पेपरफुटीची घटना घडली आहे.
शुभम खैरनारला दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड
नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात नाशिकमधून अटक करण्यात आलेल्या शुभम खैरनार याला बुधवारी मुंबई न्यायालयाने दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड दिला. सीबीआय त्याला पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेण्याची शक्यता आहे.
असे पोहोचले गेस मटेरियल सर्वांकडे
एसओजीचे आयजी अजय पाल लाम्बा यांनी सांगितले की, सीकरमधील विद्यार्थ्याला हे गेस मटेरियल प्रथम एका मित्राकडून मिळाले आणि त्याने ते इतरांना पाठवले. नंतर ते अनेक कोचिंग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आणि परीक्षेपूर्वी जयपूर व आसपासच्या भागातील उमेदवारांकडे गेले.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, केरळमधील विद्यार्थ्याने हे गेस पेपर सीकरमधील एका हॉस्टेल मालकाला आणि मित्रांना पाठवले होते. त्या हॉस्टेल मालकाने हे पेपर विद्यार्थ्यांमध्ये वाटले आणि ते उपयोगी ठरू शकतात असे सांगितले.
मात्र, त्याच हॉस्टेल मालकाने नंतर स्थानिक पोलिसांना या गेस पेपरबाबत माहिती दिली. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नसंच वाटण्यात आल्याची माहिती त्याने दिली होती.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे साहित्य गुरुग्राममधील एका व्यक्तीद्वारे राजस्थानमध्ये पोहोचवण्यात आले. स्रोतांच्या मते, पेपरफुटी नाशिकमधून झाल्याचा संशय आहे.