विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 07:42 IST2026-05-14T07:38:11+5:302026-05-14T07:42:02+5:30

यंदा हिंद महासागरात ‘आयओडी’ निर्माण होईल. तो पॉझिटिव्ह असेल, अशा पूर्वानुमानामुळे अल-निनोचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज आहे.

Special article: Rain forecast likely to improve! | विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!

विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!

-कृष्णानंद होसाळीकर (ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ)
यंदा अल-निनोचा नकारात्मक परिणाम  मान्सूनवर  होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, तेव्हाच इंडियन ओशियन डायपोल तयार होण्याची शक्यता असल्यामुळे पावसाला उभारी मिळण्याचीही शक्यता आहे. त्याविषयी लोकांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षा आहे. भारतीय हवामान खात्याने पहिल्या टप्प्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी होईल व अल-निनो प्रशांत महासागरात सक्रिय होण्याची शक्यता आहे, असे पूर्वानुमान दिले आहे. पण, त्याचवेळी इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सक्रिय होईल, अशी शक्यता आहे, असेही म्हटले आहे. असे झाले तर भारतातील पावसाचे आकडे सुधारण्याची शक्यता आहे. अल -निनो हा एक व्यापक हवामान घटक असून, त्याचा परिणाम जागतिक हवामानावर काही ठिकाणी अनुकूल, तर काही ठिकाणी (भारतीय खंड) प्रतिकूल असतो. त्या मानाने आयओडीचा प्रभाव भारत व संलग्न भागांवर असू शकतो. 

भारतीय हवामान शास्त्र विभागाने २०२६ साठी जून ते सप्टेंबरदरम्यान मान्सूनचा अंदाज वर्तविल्यानंतर दोन गोष्टींची चर्चा प्रामुख्याने होत आहे. यातील पहिला घटक म्हणजे अल-निनो आणि दुसरा घटक म्हणजे इंडियन ओशन डायपोल. अनेकांना अल निनोबाबत माहिती आहे. तशी चर्चाही आहे, पण इंडियन ओशन डायपोल नेमका काय आहे, तो नेमका कसा काम करतो, त्याचा भारतातल्या मान्सूनवरती काय प्रभाव असू शकतो.. असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

इंडियन ओशन डायपोल हा भारताच्या दक्षिणेला असलेल्या हिंद महासागराच्या पश्चिम आणि पूर्व हिंद महासागराच्या तापमानातील फरक आहे. या फरकानुसार, इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हटला जातो. पॉझिटिव्ह ज्यावेळी असेल, ज्यावेळी पश्चिम हिंद महासागरातील तापमान पूर्व हिंद महासागरातील तापमानापेक्षा जास्त असेल. त्यावेळी इंडियन ओशन  डायपोल पॉझिटिव्ह किंवा घन असतो. तर विरुद्ध म्हणजे पूर्व हिंद महासागरातील तापमान जास्त व पश्चिम हिंद महासागरातील तापमान कमी असेल, तेव्हा त्याला निगेटिव्ह आयओडी म्हटले जाते.

ढोबळमानाने सर्वसाधारणत: इंडियन ओशन डायपोल जेव्हा पॉझिटिव्ह असतो, तेव्हा भारतील मान्सूनचे आकडे सुधारण्याची शक्यता असते. पण,  प्रतिकूल प्रभाव भारतीय मान्सूनवर असतो, तेव्हा आयओडी निगेटिव्ह असतो. आपल्याकडे मान्सूनदरम्यान नैऋत्य मोसमी वारे वाहतात; ते अल निनोमुळे विस्कळीत होण्याची शक्यता असते. त्यामुळे नैऋत्येकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्याची तीव्रता क्षीण होते. त्यामुळे मान्सूनचा पाऊस कमी होतो. इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह असतो, तेव्हा मोसमी वारे सक्षम होतात. परिणामी अल-निनोचा प्रभाव कमी होतो, असे दिसून आले आहे. इंडियन ओशन डायपोलला आणखी एक नाव आहे, ते म्हणजे इंडियन निनो. अल-निनोच्या विरोधी प्रभावाला काऊंटर करण्यासाठी याचा फायदा होतो. 

हा आयओडी हिंद महासागरात कधी निर्माण होणार, हे साधारणत: तीन महिने अगोदर सांगता येते. तो धन असेल की ॠण असेल, हेदेखील सांगता येते. यंदाच्या पूर्वानुमानात मान्सूनच्या उत्तर्धात आयओडी हिंद महासागरात निर्माण होईल, असे म्हटले आहे. तो पॉझिटिव्ह असेल, असाही अंदाज आहे. त्यामुळे त्यात अल-निनोचा प्रभाव काही प्रमाणात कमी करण्याची क्षमता आहे, असा अंदाज आहे. यामुळे भारतातील पावसाच्या आकडेवारीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. अल-निनोचे पूर्वानुमान वर्तवण्यातली अचूकता खूप जास्त आहे. आयओडीचे पूर्वानुमान मध्यम ते चांगला स्वरूपाचे आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. 

थोडक्यात मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव असेल आणि आयओडी पॉझिटिव्ह असण्याची शक्यता असेल, तर त्याचा फायदा भारतातील मान्सूनला होईल. अशी काही वर्षे आहेत जेव्हा अल-निनो होता, पण आयओडी नव्हता. तेव्हा पावसाची तफावत मोठी होती. २०१५-१६ मध्ये सुरुवातीला हवामान विभागाने ९३ टक्के सरासरी पाऊस होईल, असे म्हटले होते नंतर सुधारित पूर्वानुमान आणखी खाली आणले. मात्र, त्या वर्षीचा एकूण पाऊस कमी झाला. त्यावेळी अल -निनोला काऊंटर करण्यास आयओडी नव्हता. मात्र, १९९७-९८ साली अल-निनो होता, तेव्हा आयओडीही पॉझिटिव्ह होता. तेव्हा मान्सून बाधित झाला नव्हता.

अल-निनो प्रशांत महासागरात, तर आयओडी हा हिंद महासागरात तयार होतो. आता आयओडी तयार कधी होणार, तो प्रगल्भ कधी होणार, त्याची तीव्रता किती आहे; यावर भारतातील आकडेवारी सुधारण्याची चिन्हे आहेत. जर तो उशिरा निर्माण झाला, तर फारसा प्रभाव दिसणार नाही. जुलै-ऑगस्टदरम्यान तयार झाला, तर त्याचा चांगला प्रभाव होईल. एकंदर भारतातील मान्सून हा अनेक हवामानातील घटकांवरती अवलंबून असतो, हे मात्र खरे आहे. त्यातले काही घटक दूरस्थ असतात, तर काही स्थानिक !

Web Title : हिंद महासागर द्विध्रुव से बारिश के पूर्वानुमान में सुधार की संभावना!

Web Summary : अल नीनो मानसून पर नकारात्मक प्रभाव डाल सकता है, लेकिन हिंद महासागर द्विध्रुव (आईओडी) वर्षा में सुधार कर सकता है। आईओडी का सकारात्मक चरण अल नीनो के प्रभाव को कम कर सकता है, संभावित रूप से भारत के मानसून के आंकड़ों में सुधार कर सकता है, खासकर अगर यह जुलाई-अगस्त तक विकसित हो।

Web Title : Chance to improve rain forecast with Indian Ocean Dipole!

Web Summary : El Nino may negatively impact monsoon, but the Indian Ocean Dipole (IOD) could improve rainfall. IOD's positive phase could counter El Nino's effect, potentially improving India's monsoon figures, especially if it develops by July-August.